क्रूझ ड्रग प्रकरणात एनसीबी अधिकारी असल्याचे भासवून किरण गोसावीकडून वसुली
मुंबई पोलीस एसआयटीच्या तपासातील माहिती
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीसह वैयक्तिक पंचांवर लावण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांचा तपास मुंबई पोलिसांची एसआयटी करत आहे. काही लोकांनी एसआयटीच्या नावाचा वापर करुन वसुली केली, असं तपासादरम्यान, एसआयटीच्या निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी प्रभाकर साईलनं मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्यानं याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. अनेक खाजगी गुप्तहेरांनी आपण एनसीबीचे अधिकारी आहोत, असं भासवलं. तसेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला विश्वास दिला की, ते आर्यन खानला या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढू शकतील. मुंबई पोलिस याच तपासाच्या पार्श्वभूमीवर केपी गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्यासाठी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब नोंदवण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पूजा ददलानीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पूजाला पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृतीची सबब देत पूजानं मुंबई पोलिसांकडे वेळ मागितला आहे. दरम्यान, पोलिसांनी पूजा ददलानीला लवकरात लवकरत आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावीनं स्वतःला एनसीबी अधिकारी असल्याचं भासवलं. यामागे पूजा ददलानीला विश्वासात घेण्याचाच मूळ हेतू होता. त्याबदल्यात आर्यनला सोडून पैसे उकळण्याचा कट होता. मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणी ददलानीनं तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. कारण तिनंच किरण गोसावीला पैसे दिले होते. त्यावेळी चिक्की पांडेही उपस्थित होता. त्यामुळे चिक्की पांडेलाही चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजावलं आहे. दरम्यान, चिक्की पांडेला कोरोना झाल्यामुळं तो चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परळ परिसरात पूजा ददलानीशी बोलताना किरण गोसावीनं आर्यन खानचे काही फोटो दाखवले होते आणि आर्यन खानची एक ऑडिओ क्लिपही ऐकवली होती. दरम्यान, ही तिच ऑडिओ क्लिप आहे, ज्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी ट्वीट केला होता. ज्यामध्ये किरण गोसावी ऑफिसमध्ये बसून आर्यन खानचं फोनवरुन कोणाशीतरी बोलणं करुन देत होता. दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप मुंबई पोलिसांना तपासात एनसीबीचा कोणताही सहभाग असल्याचं आढळून आलेलं नाही. या प्रकरणात किरण गोसावी विरोधात अनेक महत्त्वाचे धागेदोरे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत.