पाटणा: बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षामध्ये फूट पडली असून, कौटुंबिक तसेच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. सुरुवातीला या पक्षातील ५ खासदारांनी बंडखोरी करत चिराग पासवान यांना हटवल्याची घोषणा केली. मात्र, यानंतर काहीच वेळात चिराग पासवान यांनी या ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. या नाट्यमय घडामोडीत भर म्हणून आता बंडखोरी केलेले पशुपतीकुमार पारस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले असून, त्यांची बिनविरोध झाल्याची माहिती मिळाली आहे.
लोक जनशक्ती पक्षाच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पारस यांच्यासमोर इतर कुणीही पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे पशुपतीकुमार पारस यांची बिनविरोध पक्षाध्यक्षपदी निवड झाली. या सर्व घडामोडी पाहता काकाच पुतण्याला भारी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हे सर्व राजकीय नाट्य सुरू असताना चिराग पासवान यांनी पारस यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी चिराग पासवान गटाने बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी कटकारस्थान केल्याचा आरोप देखील केला. कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नयेत. बंद दाराआड सर्व मुद्द्यांचा निपटारा व्हावा, असे वाटत होते. गेल्या काही दिवासांपासून माझी तब्येत बरी नव्हती. मी जास्त घराबाहेर पडू शकलो नाही. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत कट रचण्यात आल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला होता.
दरम्यान, होळीच्या सणाला आमचे कुटूंब एकत्र नव्हते. काकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सफल झाला नाही. मी रामविलास पासवान यांचा मुलगा आहे. मी आधी कधी घाबरलो नाही, आताही घाबरणार नाही. हा लढा मोठा असून, कायदेशीर लढाईलाही तयार असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.