संपादकांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सकाळी नवाच्या ठोक्यालाच चंदा कोल्हापूरकरांच्या दारावरची बेल वाजवली. दार उघडणाऱ्या नोकराचे दोन्ही हात तेलाने माखलेले होते, त्या रेडयाने जाड भिंगाच्या चष्म्यातून आमच्याकडे मारक्या म्हशीसारखं रोखून पाहत विचारलं , ‘ काय काम हाय ?’ आम्ही पत्रकार असल्याचे सांगून ,दादांनी मुलाखत घेण्यासाठी नऊ वाजता बोलवल्याचं सांगितल्यावर, ‘ नऊ म्हणजे नऊलाच हजर . काय जेवायला बोलवलं की काय ?’ असं काहीसं तोंडातल्या तोंडात पुटपुटत, हाताने आम्हाला बाहेरच थांबण्याचा इशारा करत, तो डोलत डोलत आत गेला. आत जाऊन त्याने मालकाची परवानगी घेतली असावी. परत येऊन त्याने आम्हाला पाठीमागे येण्याचा इशारा केला. आम्ही त्याच्या मागे मागे गेलो. एका खोलीत चंदा कोल्हापूरकर आरशासमोर एका खुर्चीवर बसले होते. आरशातूनच आमच्याकडे पाहून स्मितहास्य करीत दादांनी आम्हाला बसण्याचा इशारा केला. आम्ही शेजारच्या खुर्चीवर बसलो. त्या रेडयाने परत दादांच्या डोक्यावर तेल ओतून मालिश सुरू केली.
दादा – रोज घराबाहेर पडण्याआधी डोक्यावर भरपूर तेल घालून मालिश करून घेतो. त्याचा असा फायदा होतो की, बाहेर काहीही घडलं ना तरी आपलं डोकं शांत राहतं. अर्धी संपली, अर्धीच राहिली . आता तीही संपवून घेतो.
दादांनी अर्धी संपलेली आणि अर्धी भरलेली तेलाची बाटली आम्हाला दाखवली आणि ते परत आपल्या डोक्याची मालिश करवून घेण्यात तल्लीन झाले. बराच वेळ आम्ही शांत बसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी डोळ्यांनीच आम्हाला प्रश्न विचारण्याचा इशारा केला.
आम्ही – दादा , हे काय चाललंय ? कसं वाटतं तुम्हाला ?
दादा – (मिश्किलपणे ) तेलाची मालिश चालली आहे डोक्याला . छान वाटतंय .
आम्ही – ( हसत) ते नाही दादा . बाहेर पक्षापक्षांमध्ये काय चाललं आहे, ते विचारतोय मी .
दादा – (शांतपणे ) कुठे काय चाललं आहे ? सगळं व्यवस्थित आहे.
आम्ही – (आश्चर्याने) दादा , बाहेर जे चाललं आहे त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला ?
दादा – (शांतपणे) कुठे काय चाललंय ? अहो, संसार म्हटला की जसं भांड्याला भांड लागतंच तसंच राजकारण म्हटलं की थोड्याफार भानगडी व्हायच्याच . होईल सगळं शांत हळूहळू.
आम्ही – नाही पण दादा , अशा भानगडींमुळे माणसं दुरावतात, नाती तुटतात असं नाही का वाटत तुम्हाला ?
दादा – ( समजावण्याच्या सुरात) हे पहा , बांधा बांधावरून भावा भावांमध्ये भानगडी होत नाहीत का ? अहो , एकमेकांची डोकी फोडली म्हणून सख्खे भाऊ कधी सावत्र होऊन जातात का ? ते सख्खेच राहतात. रक्त एकच असतं ना दोघांचं ?
आम्ही – हो पण या भानगडी जरा जास्तच होत आहेत असं नाही का वाटत तुम्हाला ?
दादा – (आश्चर्याने) आम्ही करतोय भानगडी ? आम्ही नाही करत बाबा भानगडी.
आम्ही – ( डबल आश्चर्याने ) तुम्ही नाही करत ? मग हे जे काही सुरू आहे ते कोण करतंय ?
दादा – ( शांतपणे ) पेइंग गेस्ट . आमचे पेइंग गेस्ट करताहेत ते सगळं .
आम्ही – ( अचंबित होत) पेइंग गेस्ट ?
दादा – (शांतपणे ) हो , ते कोकणातले पेइंग गेस्ट आले आहेत ना सध्या आमच्याकडे रहायला. पूर्वी ते आमच्या त्या लहान भावाकडे होते ना, पेइंग गेस्ट म्हणून. तेव्हाचा काहीतरी राग असेल . आता निघत असेल तो.
आम्ही – दादा , पण तुमच्या भावाच्या घरातला पेइंग गेस्ट तुम्ही तुमच्या घरात कसा घेतलात ? भावाला राग येईल असं नाही वाटलं तुम्हाला ?
दादा – (शांतपणे) हे पहा , घर चालविण्यासाठी आम्हाला दोघांनाही घरात पेइंग गेस्ट ठेवावेच लागतात ; आणि आम्ही काही हा पेइंग गेस्ट डायरेक्ट भावाच्या घरातून आमच्या घरात घेतलेला नाही. आधी दुसरीकडे राहून आले आहेत ते. घरं बदलायची सवयच आहे त्यांना.
आम्ही – म्हणजे ते तुमचंही घर सोडतील असं म्हणायचं आहे का तुम्हाला की, तुम्हीच काढाल त्यांना बाहेर ?
दादा – ( डोळे बारीक करून आमच्याकडे पाहत ) हे पहा , मुळातच ते कुठेही पेइंग गेस्ट म्हणूनच जातात , त्यात ते अंगार आहेत आणि बाकी सगळे भंगार आहेत . नाही का ?
आम्ही – ( नेमका अंदाज घेत ) अच्छा मग ?
दादा – अहो, काम झाल्यावर अंगार कोणी घरात ठेवतं का ?