भारतीय समाज पूर्वीपासूनच विविध स्तरीय आणि वर्णभेदाने ग्रस्त असलेला आपल्याला पहायला मिळतो. ज्ञानाच्या क्षेत्राशी हजारो वर्षापासून बहुजनांचा संबंध तोडण्यात आला होता. अशा परिस्थितीत ज्ञान ग्रहण करण्याचा, देण्याचा, शिकण्या_ शिकवण्याचा अधिकार विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहिला. आज जेव्हा आपण वाचन संस्कृती विषयी चर्चा करतो तेव्हा भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर नजर टाकणे क्रमप्राप्त ठरते . वाचनाचा विकास करताना प्रथम आपण वाचनाकडे वळणं हे अधिक महत्त्वाचं आहे .
पूर्वीच्या काळी सामाजिक व धार्मिक पारतंत्र्यामुळे आणि आजच्या काळात आधुनिकतावादाच्या रेटयामुळे आपले वाचन अजूनही मर्यादितच आहे. माहिती -तंत्रज्ञान झपाट्याने आपल्याला कवेत घेतयं हे खरं आहे पण म्हणून वाचनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा लेखनप्रपंच साऱ्यांचा वाचनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी केलेला आहे .
साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वीची ग्रामीण भागातील शाळा – महाविदयालयांची ‘ स्थिती पाहता ग्रंथालयाचा स्वतंत्र विभाग पाहायला मिळणे तसे दुर्मिळच ! आम्हीदेखील शाळा महाविदयालयात शिकत असताना अवांतर वाचनासाठी पुस्तके आणलेली आठवत नाही . किंबहुना तशी सोयदेखील नव्हती .परंतु आज बदललेली परिस्थिती आणि सामाजिक गरज पाहता शासनाने शाळांमधून *ज्ञानचक्षू* *वाचनालय* उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे . तसेच मी माझ्या शाळेत विद्यार्थांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याची सुरुवात मी माझ्या वाढदिवसदिनी शाळेला १० पुस्तके भेट देऊन केली त्यामुळे शाळेचे ग्रंथालयही समृध्द झाले आणि मुलांना पुस्तकाचे महत्त्वही वाटू लागले. नुसती पुस्तके वाटून किंवा भेट देऊन उपयोग नाही तर दुपारच्या सत्रात एक तासिका आम्ही शिक्षक _विदयार्थी वाचनासाठी देतो .
आज शहरातील खाजगी शाळांमधील विदयार्थांवरचा अभ्यासाचा ताण व महाविद्यालयीन युवकांचे मोबाईलवेड, बिझी शेड्यूल यातून या सर्वांना अवांतर वाचनाची संधी मिळायला हवी आणि अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकांनी सतत प्रयत्नशील असायला हवे . टी .व्ही, मोबाईल मुलांच्या हातात देण्यापूर्वी त्यांना लहानपणापासूनच चित्रमय गोष्टींची पुस्तके हाताळायला देऊन कुतुहल जागृत करण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा .
आजवर जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षणामुळे आणि वाचनामुळे . उदाहरण दयायचं झालं तर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झालाच पण ते हटवादाने शिक्षित झाले. शिक्षित असल्यामुळे ते पुण्यात ज्या ठिकाणी राहत होते त्या मुस्लिम मोहल्ल्यात कबीर बीजक नावाचा ग्रंथ वाचण्यासाठी , केवळ वाचता येतं म्हणून महात्मा फुले यांना बोलावले जायचे.कबीरांच्या समतावादी विचारांचा प्रभाव फुले यांच्यावर पडला व ते सामाजिक क्रांतीच्या चळवळीचे अग्रणी बनले.
त्याचप्रमाणे डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे ग्रंथप्रेम सर्व जगाला ज्ञात आहे. बाबांचे वडिल सुबेदार रामजी आंबेडकर यांनी बाबांच्या वाचनाकडे विशेष लक्ष दिले होते . बालवयातच बाबांना वाचनाची विलक्षण आवड रामजींमुळे निर्माण झाली. आर्थिक चणचणीच्या काळात बाबांच्या वडिलांनी आपल्या मुलीला लग्नात घातलेले दागिने गहाण ठेवून बाबांच्या वाचनासाठी पुस्तके आणून दिली. बाबांच्या वाचनवेडामुळेच शिवचरित्राचे पहिले लेखक गुरूदेव कृष्णाजी केळुसकर प्रभावित झाले आणि त्यांनी बाबांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली, पुढे हेच आंबेडकर साऱ्या विश्वातील एक प्रज्ञावंत विद्वान म्हणून ओळखले गेले . वाचनाच्या प्रभावातून असे बहुजनांचे उद्धारक घडले आहेत.
आजचा विचार करता मुलांच्या वाचनासाठी शिक्षक आणि पालकवर्ग किती जागृत आहे ही चिंतनीय बाब आहे. अध्ययनासाठी व ज्ञान ग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती विसरून चालणार नाही.वाचनाने विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व बहुआयामी बनते. खरं तर वाचनाची आवड मूल शाळेत दाखल होण्यापूर्वी घरातूनच लागायला हवी. हल्ली सगळीकडे आयांची एकच तक्रार असते, आमचं बाळ ना, हातात मोबाईल दिल्याशिवाय किंवा टी व्ही चालू केल्याशिवाय जेवतच नाही, पण माझा प्रश्न असा आहे की, त्याला टी व्ही, मोबाईल दाखवला कुणी ? आपणच ना ! की त्याने स्वतः मागितला ? त्याऐवजी छान रंगीत चित्रांची पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवा, त्यांना ती उलट -सुलट करुन बघू देत. त्यातील वेगवेगळे आकार, रंग त्यांना आवडतील. त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते मूल करेल. त्याला उत्सुकता वाटेल. त्याची मानसिक वाढ चांगली होईल. रामायण, महाभारतातील कथा ऐकूनच वाचनाची अभिरूची विकसित होईल. संस्कारदिपिका , इसापनीती, तेनालीरामनच्या गोष्टी, प्राणी -पक्षी यांची माहिती देणारे साहित्य, शास्त्रज्ञांच्या कथा, बडबडगीते, गाणी, संस्कार गीते, चरित्र, यांचा समावेश असलेले साहित्य मुलांना बालवयातच दिले गेले पाहिजे .
वाचनामुळे मनोव्यापार तयार होतो, मुलांना नवनवीन कल्पना सुचतात. यातूनच त्यांची मानसिक वाढ होते.टी. व्ही वर कार्टून्सच्या माध्यमातून सुष्ट- दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष दाखवला जातो परंतु त्यात कल्पनाशक्तीला वाव नसतो. वाचनामुळे ती क्षमता विकसित होते.पूर्वी संस्कृतच्या श्लोकांचे वाचन -पठण हा वाणीच्या उच्चारांच्या शुद्धतेसाठी उपाय सांगितला जायचा.
अवघ्या महाराष्ट्राचं साहित्यिक वैभव म्हणजे *शामची* *आई* ही कलाकृती . भावनांच्या आक्रंदनातून संस्कार घडवणारं, घरोघरी पारायणं करावीत असं हे पुस्तकं ज्यानं महाराष्ट्रातल्या असंख्य पिढया घडविल्या आणि आजही ते काम अविरतपणे चालू आहे. अशा साहित्याच्या वाचनातून मुलांचा भावनिक विकास तर होतोच शिवाय पालकांनाही संस्कारांची शिदोरी मिळते पुढच्या पिढीला देण्यासाठी ! तसेच शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा, अकबर -बिरबलाच्या चातुर्यकथा यामुळे मुलांच्या व्यवहारज्ञानात भर पडते. प्रत्येक गोष्टीकडे चौकस वृत्तीने पाहण्याची सवय लागते. महाविदयालयीन जीवनात थोर पुरुषांची आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, नाटक, वैचारिक निबंध यांची गोडी लागली पाहिजे. आत्मचरित्रातून मोठी माणसं कशी घडली हे समजते. त्यातलच एखादं पुस्तक आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एखादं पानं आयुष्य बदलून टाकू शकतं आणि एखादं वाक्य जीवनाचं ध्येय ठरवू शकतं, एवढी ताकद वाचनात आहे.
कथा -कादंबऱ्यातील तात्विक भूमिका, ग्रामीण – दलित साहित्य, आदिवासी साहित्य यांच्या वाचनातून आपली वाटचाल वैचारिक साहित्याकडे होते. वैचारिक प्रगल्भतेवर उभं राहिल्यावर आपल्याला समाज कळतो . वैचारिक साहित्यातून आपलं आत्मभान जागृत होतं आणि आत्मभानं जागृत होणं हा मानवी विकासाचा टप्पा मानला जातो. जगाचा आत्तापर्यंत जो विकास झाला आहे तो केवळ वाचनामुळेच !
आपल्या आयुष्यावर दोन गोष्टींचा प्रभाव जास्त पडतो, एक आपले मित्र आणि दुसरे म्हणजे पुस्तक. मग पुस्तकालाच आपला मित्र बनवलं तर ! थोर लेखक Richard Steel म्हणतात, Reading is to the mind what exercise is to the body .
जिथे वाचन होते तिथे विचार होतात आणि हेच विचार आपल्याला आपले ध्येय ठरवायला आणि गाठायला मदतही करतात. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होत असते . वाचनामुळे आपले भावविश्व, अनुभवविश्व विस्तारते. जगातले सर्व अनुभव आपण घरबसल्या घेऊ शकतो आणि एकाच जीवनात अनेक आयुष्य जगू शकतो .
आपण पूर्वीपासूनच आपला सांस्कृतिक वारसा लिखित साहित्याच्या वाचनातून जतन करत आलो आहोत. जगात जर कोणती संस्कृती श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे वाचन संस्कृती. वाचन संस्कृतीची नाळ प्रत्येक माणसाशी प्राचीन काळापासून जोडली गेली आहे. “वाचनाचा लळा, फुलवी जीवनाचा मळा ” हे अगदी खरं आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ग्रंथांचे व वाचनाचे महत्त्व अतिशय सुरेख वर्णन केले आहे ते म्हणतात, ‘या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविती माणुसकी अन् ग्रंथ शिकविती शांती I चला तर मग एक पाऊल पुढे टाकूया वाचन संस्कृती जतन करण्यासाठी !