नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. अनेक महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांना नारळ देण्यात आल्याने खातेवाटपाकडे लक्ष लागले होते. पियूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. रेल्वेची जबाबादारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी असेल. अरुण जेटली यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या गोयल यांच्याकडे रेल्वेसारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना डच्चू मिळाला आहे.
स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय काढून घेण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे केवळ महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा कारभार ठेवण्यात आला आहे. स्मृती यांनी याआधी शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यावेळी त्यांची डिग्री वादात सापडली होती. काही काळासाठी त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभारदेखील होता. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं. मात्र आता या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे.
नारायण राणेंवर महत्त्वाची जबाबदारी
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या चार नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे या खातेवाटपावरून स्पष्ट होत आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या चार महाराष्ट्रातील शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या चार जणांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला खासदार रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, नवीन खातेवाटपानुसार रावसाहेब दानवे यांना बढती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना कोणते खाते मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नारायण राणे यांनी सर्वांत आधी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून नारायण राणे यांना महत्त्वाचे खाते मिळेल, असा कयास बांधला जात होता. नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात असून, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याचबरोबर डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रिपद गुजराती व्यक्तीकडे
आरोग्य मंत्रिपददेखील गुजराती व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे. मनसुख मांडविया यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. मांडविया मोदींचे विश्वासू मानले जातात. शहांकडे गृह मंत्रालयासोबतच सहकार मंत्रालयाची जबाबदारीदेखील दिली गेली आहे. या मंत्रालयाची निर्मिती कालच करण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी प्रमोशन मिळालेल्या अनुराग ठाकूर यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय देण्यात आलं आहे. याआधी ते अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.
मंत्र्यांचे खातेवाटप एका क्लिकवर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी- विज्ञान तंत्रज्ञान विभाग
अमित शहा- सहकार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
मनसुख मांडवीय- केंद्रीय आरोग्य मंत्रालय, खते-रसायन मंत्रालय
अश्विनी वैष्णव- केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि आयटी व कम्युनिकेशन मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद
पियूष गोयल- वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ग्राहक कल्याण मंत्रालयासोबतच वाणिज्य मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्रायल, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय
अनुराग ठाकूर- माहिती व प्रसारण मंत्रालय, यासोबतच युवा मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
ज्योतिरादित्य शिंदे- नागरी उड्डाण मंत्री
नारायण राणे- सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME मंत्रालय)
सर्बानंद सोनोवाल- पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालय, आयुष मंत्रालय
मुख्तार अब्बास नक्वी- केंद्रीय अल्पसख्यांक मंत्रालय
डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
रामचंद्र प्रसाद सिंग- स्टील मंत्रालय
स्मृती इराणी- आता केवळ बालविकास मंत्रालय
भुपेंद्र यादव- श्रम मंत्रालय
आर.के.सिंह- केंद्रीय कायदे मंत्री
गिरीराज सिंह- ग्रामविकास मंत्रालय
किरन रिजीजू- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री
पशुपती पारस- अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
महेंद्र नाथ पाण्डेय – अवजड उद्योग मंत्री
पुरूषोत्तम रुपाला- मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्री
जी.किशन रेड्डी- सांस्कृतिक व पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
१. राव इंद्रजीत सिंह- सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), योजना मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि कॉर्पोरेट मंत्रालय राज्यमंत्री
२. डॉ. जितेंद्र सिंह- विज्ञान आणि प्राद्योगिकी मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
राज्यमंत्री
१. श्रीपाद येसो नाईक- पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रायल राज्यमंत्री, यासोबतच पर्यटन राज्यमंत्री
२. फग्गनसिंग कुलस्ते- इस्पात मंत्रालय राज्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्रालय राज्यमंत्री
३. प्रल्हादसिंह पटेल- जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री
४. अश्विनी कुमार चौबे- उपभोक्ता, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री, यासोबतच पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय राज्यमंत्री
५. अर्जुन राम मेघवाल- संसदीय कार्यमंत्री राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री
६. व्ही.के.सिंह- रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय राज्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्रालय राज्यमंत्री
७. कृष्णपाल- विद्युत मंत्रालय राज्यमंत्री, अवजड उद्योग राज्यमंत्री
८. रावसाहेब दानवे- रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री, कोळसा मंत्रालय राज्यमंत्री आणि अन्न मंत्रालय राज्यमंत्री
९. रामदास आठवले- सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री
१०. साध्वी निरंजन ज्योती- उपभोक्त, खाद्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्रालाय राज्यमंत्री
११. डॉ. संजीव कुमार बाल्यान- मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअर मंत्रालय राज्यमंत्री
१२. नित्यानंद राय- गृहमंत्रालय राज्यमंत्री
१३. पंकज चौधरी- अर्थमंत्रालय राज्यमंत्री
१४. अनुप्रिया सिंह पटेल- वाणिज्य मंत्रालय राज्यमंत्री
१५. एस.पी.सिंह बघेल- कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यमंत्री
१६. राजीव चंद्रशेखर- कौशल्य विकास राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्राद्योगिकी मंत्रालय राज्यमंत्री
१७. शोभा करंदलाजे- कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री
१८. भानु प्रताप सिंह वर्मा- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय राज्यमंत्री
१९. दर्शन विक्रम जरदोश- वस्त्रोद्योग राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री
२०. व्ही. मुरलीधरन- परराष्ट राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री
२१. मिनाक्षी लेखी- परराष्ट्र राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री
२२. सोम प्रकाश- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राज्यमंत्री
२३. रेणुका सिंह सरुता- जनजाती प्रकरणांमध्ये राज्यमंत्री
२४. रामेश्वर तेली- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय राज्यमंत्री आणि श्रम कल्याण व रोजगार मंत्रालय राज्यमंत्री
२५. कैलाश चौधरी- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री
२६. अन्नपूर्णा देवी- शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री
२७. ए.नारायणस्वामी- सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री
२८. कौशल किशोर- आवास आणि शहरी प्रकरणं मंत्रालय राज्यमंत्री
२९. अजय भट्ट- संरक्षण मंत्रालय राज्यमंत्री आणि पर्यटन विकास राज्यमंत्री
३०. बी.एल.वर्मा- उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय राज्यमंत्री
३१. देवुसिंह चौहान- संचार मंत्रालय राज्यमंत्री
३२. अजय कुमार- गृहमंत्रालय राज्यमंत्री
३३. भगवंत खुबा- नवऊर्जा मंत्रालय राज्यमंत्री आणि रसायन मंत्रालय राज्यमंत्री
३४. कपिल पाटील- पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्री
३५. प्रतिमा भौमिक- सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय राज्यमंत्री
३६. डॉ. सुभाष सरकार- शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री
३७. डॉ. भागवत कराड- अर्थ मंत्रालय राज्यमंत्री
३८. डॉ. राजकुमार रंजन सिंह- परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री
३९. डॉ. भारती पवार- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्री
४०. बिश्वेश्वर टुडू- जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री
४१. शांतनु ठाकूर- बंदरं आणि जल मंत्रालय राज्यमंत्री
४२. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई- महिला आणि बालकल्याण मंत्रालय राज्यमंत्री, आयुष मंत्रालय राज्यमंत्री
४३. जॉन बारला- अल्पसंख्यांक मंत्रालय राज्यमंत्री
४४. डॉ. एल. मुरुगन- मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालय राज्यमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री
४५. निसिथ प्रमाणिक- गृह मंत्रालय राज्यमंत्री, क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री