रत्नागिरी : नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच असं काही नाही, असंही म्हटलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे. चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आलं. या एअरपोर्टवरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचं निश्चित झालं. कालच उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत सकाळी ११ वाजता चर्चा केली आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं राऊत म्हणाले.
माझं ज्योतिरादित्य यांच्याशी बोलणं झालं. ते माझ्याशी मराठीतच बोलतात. मला म्हणाले. विनायकभाऊ, मी स्वत: येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत येणार आहे. तिथून नवी मुंबईत जाणार आहे, असं ज्योतिदारित्य यांनी सांगितलं. काल ११ वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला १२ वाजता फोन करून सांगितलं की आम्ही ९ तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, अशी माहितीही त्यांनी दिली.
असं होईल उड्डाण
९ ऑक्टोबर रोजी होणार नवरात्राचा तिसरा दिवस आहे. त्या दिवशी दुपारी १२ वाजता विमानाचा टेक ऑफ होईल. १ वाजून १० मिनिटाने सिंधुदुर्गात विमानात उतरेल. १.३५ वाजता मुंबई करता पुन्हा टेक ऑफ होईल. एअर अलायन्स कंपनीच्या माध्यमातून हा प्रवास होईल. ७२ सीट असलेलं हे विमान मुंबईत ६ तारखेलाच आलं आहे. एक एअरक्राफ्ट पुढच्या आठवड्यात आणलं जाईल. सिंधुदुर्ग आणि मुंबईकरांना सोयीस्कर वेळ ठरेल अशीच वेळ अदानी ग्रुपशी चर्चा करून घेतली आहे. मी एअर अलायन्सला भेटून विमानतळ सुरू करण्यास सांगितलं. त्यांनी ७ ऑक्टोबरपासून विमान उड्डाण सुरू करायला तयार आहोत असं सांगितलं होतं. तसं पत्रं दिलं होतं. त्या पत्राची माहिती सर्वांना दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
अज्ञानांना कळत नाही
काही अज्ञान माणसाला कळत नाही. त्यांना इंग्रजी समजत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे. आता जे बडेजाव मारतात फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही कोण सांगणारे? तुम्हाला कोणी अधिकार दिला. काही माहीत नसेल तर चार लोकांना विचारा. सोयीसाठी अमित शहांना विचारा. तुम्हाला काय अधिकार? काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. असावा. पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नसावा, अशी खोचक टीका त्यांनी नितेश राणेंवर केली.
राणेंनी १९९० मध्ये या विमानतळाचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ते २२ वर्ष गायब होते. केवढं मोठं कर्तृत्व. चार वर्षे त्यांचा खासदार होता. या चार वर्षात फिरकले नाही, कधी संसंदेत आवाज उठवला नाही, अशी टीका करतानाच तुम्हाला याचं श्रेय घेता येणार नाही. मी आणि वैभव नाईक यांनी पाहणी केली. २०१४ मध्ये आम्ही एमआयडीसीकडे विमानतळाचा स्टेट्स मागितला. तेव्हा त्यांनी अहवाल दिला. फक्त १४ टक्के काम झालं होतं. माती काढून खोदून ठेवली होती. मी, वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी सातत्याने प्रयत्न केला. केसरकरांनी डीपीसीतून निधी दिला. मी स्ट्रिट लाईटसाठी निधी दिला. सुभाष देसाईंनीही निधी दिला. १०० सुरक्षा पोलीस दिले. शंभुराजे देसाईंशी मिटिंग केली. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. पण श्रेयाची फुशारकी मिरवणाऱ्या राणेंनी तर अजिबात श्रेय घेऊ नये.