राज ठाकरेंचे नाणारसाठी उध्दव ठाकरेंसह शरद पवार, देवेंद्र फडणवीसांना पत्र

मुंबई : कोकणातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन बोलताना कोकणवासियांना भराडी देवीच्या साक्षीने कोकण विकासाचे वचन दिले. या वचनास २४ तासांचाही अवधी उलटून जात नाही तोच मनसेने नाणार प्रकल्पाला सुरुवातीला केलेला विरोध सोडून आता हा प्रकल्प हातातून जाता कामा नये अशी भूमिका घेत नाणार प्रकल्प उभारणीमुळे कोकणच्या विकासास मदत होईल अशी भूमिका स्विकारली असून तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पाठविले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर ताकद लावली. तसेच हा प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही ईच्छा होती. मात्र नाणार प्रकल्पाची कुणकुण लागताच अनेक गुजराती व्यावसायिकांनी येथील जमिनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत संपादीत केल्या. त्यामुळे कोकणात परप्रातीयांची घुसखोरी झाल्याची चर्चा सुरु झाल्याने या प्रकल्पास स्थानिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध लागला. यापार्श्वभूमीवर शिवेसेनेने स्थानिकांच्या बाजूने उभे रहात नाणार येथे जाहिर सभा घेत प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना फाडून टाकत सदरची अधिसूचना रद्द केल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली.
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित करत राज्याची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. त्यामुळे ३ लाख कोटी रूपयांचा नाणारचा प्रकल्प हातातून जाणे सद्यस्थितीत परवडणारे नसल्याचे सांगत स्थानिकांचे मत परिवर्तन करण्यासाठी तज्ञांची मदत घेण्याचे आवाहन करत कसा कोकणात सुरु करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची सूचना राज यांनी केली.
त्यावेळी विरोध करणारे उध्दव ठाकरे आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. काल शनिवारी कोकणच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करेन असे वचन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याने आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्रामुळे मुख्यमंत्री कोकणवासियांना दिलेले वचन पूर्ण करणार की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असलेला विरोध कायम ठेवणार याचे उत्तर आगामी काळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
काँग्रेस नेत्याचेही मुख्यमंत्र्यांना पत्र
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण कबूल केल्यानुसार नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करण्याची आठवण करून दिली आहे. ‘3 लाख कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील 40 ते 45 हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व 1 लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी तसेच वैदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी विनंती मी आपणास या पत्राद्वारे पुन्हा एकदा करत आहे आणि म्हणूनच हे स्मरणपत्र आपल्याला पाठवत आहे,’ असं आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.