Top Newsराजकारण

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाच्या मुद्द्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिले आहे. यात राज ठाकरे यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणत्याही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.

दिवाळीच्या दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली आहे. कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारामध्ये सुरू आहे तिथंही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करुन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समूजन घेण्याची. एसटी कर्मचारी, कामगार जगला, तरच एसटी जगेल हे भान बाळगण्याची. माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अन्यथा कर्मचारी कामगारांबाबत असंतोषाचा उद्रक होईल, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button