मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जातीच्या विषयावरून दिवसागणिक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. शरद पवारांनी प्रबोधनकार ठाकरे वाचण्याच्या सूचनेला राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. पण राज ठाकरे या पुण्यातील उत्तरापुरते थांबले नाहीत, त्यांनी शनिवारी आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट करत अतिशय सूचक आणि मार्मिक अशा शब्दातली प्रबोधनकारांची आठवण करून दिली आहे. प्रबोधनकारांच्या ‘माझी जीवनगाथा’ मधूनच्या काही विचार त्यांनी मांडले आहेत. शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या निमित्ताने केलेला हा आणखी एक खुलासा आहे.
"जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!"
: प्रबोधनकार ठाकरे
'माझी जीवनगाथा' (पाने २८०-२८१)— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2021
राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतातील निवडणुकांच्या अजेंड्यावर भाष्य केले होते. त्यामध्ये आपण अजुनही निवडणुकांना सामोरे जाताना मुलभूत गोष्टींच्या पुर्ततेचे आश्वासन देत निवडणुकांना सामोरे जाते. त्यावेळी दीर्घकालीन विकासाच्या मुद्द्यावर आपल्याकडे निवडणुका लढवल्या जात नाहीत, असा दावा राज ठाकरेंनी केला होता. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या उदयानंतर १९९९ नंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण अधिक गडद झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी प्रबोधनकार वाचावेत असा सल्ला दिला होता. शरद पवारांच्या या सल्ल्याला उत्तर देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. आजोबांनी लिहिलेली सर्व पुस्तके मी वाचली आहेत, प्रबोधकारांचे संदर्भ हे त्या काळातील होते असाही खुलासा त्यांनी केला. सोयीचे प्रबोधनकार सांगू नका, त्यांची भूमिका त्या त्या काळाशी संबंधित होती, सांगायचे असतील तर पूर्ण प्रबोधनकार सांगा, नाहीतर नादी लागू नका, प्रबोधनकार तुम्हाला झेपणार नाहीत, असे सडेतोड उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.