मनोरंजन

राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; शिल्पा शेट्टीचीही चौकशी होण्याची शक्यता

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली.

आज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प (४३) या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी जामिनावर मुक्त आहेत.

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघड़कीस आणले होते. या कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकूर (२६), वंदना रवींद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या.

शिल्पा शेट्टी प्रत्येक उद्योगात भागीदार

राज कुंद्राच्या अटकेनंतर, आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टीचीही चौकशी होऊ शकते. याची तयारीही मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १४ वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असूनही, शिल्पा शेट्टीच्या वाढत्या संपत्तीचे कारण तिची राज कुंद्रासोबत असलेली व्यवसायिक भागिदारी आहे. शिल्पा शेट्टी यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरूनही कमाई करते. याशिवाय, तिच्याकडे जवळपास एक डझन ब्रँड एंडोर्समेंट असल्याचेही बोलले जाते.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या सर्वच व्यवसायिक संबंधांत शिल्पा शेट्टीचेही नाव आहे. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींच्या न्यूड व्हिडिओजचे संपूर्ण जगात प्रसारण केले गेले, त्याच प्रकारे राज कुंद्राचे अ‍ॅप जेएल ५० च्या प्रचार व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. ती राज कुंद्रासोबत राजस्थान रॉयल्स नावाच्या आयपीएल क्रिकेट टीममध्येही सामील होती आणि ज्या सतयुग गोल्ड नावाच्या कंपनीविरोधात सचिन जोशीने तक्रार केली होती. त्यातही शिल्पा भागिदार आहे.

जेव्हा-जेव्हा राज कुंद्रा वादात अडकतो, तेव्हा तेव्हा शिल्पा शेट्टीच्या ब्रँड एंडोर्समेंटची संख्याही वाढते, अशी माहितीही मुंबई पोलिसांना मिळाली आहे. ते या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत. एवढेच नाही, तर राज कुंद्राच्या सोशल मिडिया ब्रँडिंग करणाऱ्या टीमचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button