राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारली! काँग्रेसची हायकोर्टात धाव
मुंबई : राहुल गांधी यांची २८ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये सभा घेण्यात येणार होती. महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याबाबत जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी १५ दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद दिला गेला नाही आणि आता राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी आता थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी डिसेंबरमध्ये मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमाीवर राहुल गांधी यांचा मुंबई दौरा निश्चित झाला होता. तसंच काँग्रेस स्थापना दिनी म्हणजे २८ डिसेंबर रोजी त्यांची मुंबईत सभाही घेण्यात येणार होती. मात्र, काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारनंच राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली आहे.
राज्यात ओमिक्रॉनच्या फैलावाला सुरुवात झालीय. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आज २० वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील मुंबईत ५, कल्याण-डोंबिवली परिसरात १ रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम, सभा आदींवर निर्बंध आणण्यात आले आहेत. या निर्बंधांचा फटका आता राहुल गांधी यांच्या सभेला बसल्याचं पाहायला मिळत आहे.