बजाज ऑटोच्या अध्यक्षपदावरून राहुल बजाज पायउतार
नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी असलेल्या बजाज ऑटोच्या राहुल बजाज यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राहुल बजाज १९७२ पासून कंपनी चालवत आहेत. तसेच गेल्या ५ दशकांपासून बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी ते जोडलेले आहेत. आता त्यांनी आपल्या वाढत्या वयाचे कारण देत कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी बंगाल प्रेसिडेन्सी (स्वातंत्र्यपूर्व पश्चिम बंगाल) मधील मारवाडी कुटुंबात झाला. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. लहान वयापासूनच व्यावसायिक परिवारात जन्मलेल्या राहुल बजाज यांनीसुद्धा व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून आर्थिक सन्मान केल्यानंतर राहुल बजाज यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत ते बॉक्सिंग चॅम्पियन होते. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बीए मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यानंतर त्यांनी तिथल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री पूर्ण केली. १९६५ मध्ये ते भारतात परतले आणि कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले.
यावेळी त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून वकिलीत पदवीही घेतली. राहुल बजाज यांनी ६० च्या दशकात अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री प्राप्त केली. १९६८ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे म्हटले जाते. ही कंपनी राहुल बजाज यांच्या हाती आली, तेव्हा देशात एक ‘लायसन्स राज’ होते, म्हणजे देशात अशी धोरणे अस्तित्वात होती, त्यानुसार उद्योगपती सरकारच्या संमतीशिवाय काहीही करू शकत नव्हते. व्यापाऱ्यांसाठी ही एक कठीण परिस्थिती होती. उत्पादन मर्यादा निश्चित होत्या. ज्या परिस्थितीत इतर उत्पादकांना काम करणे अवघड होते, अशा परिस्थितीत बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत: ला देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून २००८ मध्ये बजाजने सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल गाठली.