रहाणेचे अर्धशतक हुकले, ‘टीम इंडिया’चा डाव गडगडला; उपहारापर्यंत दक्षिण आफ्रिका १ बाद २१ धावा
सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात असून आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती, मात्र दुसरा दिवस पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. आज सेंच्युरियनमध्ये आकाश निरभ्र आहे आणि चांगला सूर्यप्रकाशदेखील आहे. म्हणजेच सामना वेळेवर सुरू होईल. दुसऱ्या दिवसाची भरपाई करण्यासाठी आज एकूण ९८ षटके खेळवली जातील. सलामीवीर केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी ३ गड्यांच्या बदल्यात २७२ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर लोकेश राहुल याने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवलं. पहिल्या दिवशी त्याने शानदार शतक ठोकलं. त्याचा साथीदार मयंक अग्रवाल यानेही अर्धशतकी खेळी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुलने अजिंक्य रहाणेच्या साथीने डाव सांभाळत संघाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. पण तिसऱ्या दिवशी मात्र दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. पहिल्या सत्राच्या पहिल्या तासाभरात लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांना तंबूत धाडलं.
लोकेश राहुल १२२ धावांवर नाबाद असताना तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला. त्याने संयमी सुरूवात केली पण लेग साईडला जाणारा एक चेंडू खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्या चेंडूला टोलवताना तो बाद झाला आणि १२३ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. त्याच्या पाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही अर्धशतक हुकलं. रहाणे चांगली खेळी करण्याच्या उद्देशाने खेळत होता. पण लुंगी एन्गीडीचा एक चेंडू त्याला खेळता आला नाही. त्याने फटका लगावण्याचा प्रयत्न केला आणि तो किपरकडे झेल देऊन बाद झाला.
सेंच्युरियनमध्ये तिसऱ्या दिवसातील उफरापर्यंतचे पहिले सत्र संपले आहे. या सत्रात फक्त ७६ धावा झाल्या व ८ विकेट गेल्या. भारताने ७ तर आफ्रिकेने १ विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेच्या १ बाद २१ धावा झाल्या आहेत. कर्णधार एल्गर तंबूत परतल्यानंतर एडेन मार्कराम (९) आणि कीगन पीटरसन (११) आता खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत.