दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची तडकाफडकी निवृत्ती
सेन्चुरिअन : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त होते. त्याची पत्नी मुलाला जन्म देणार असून अशा परिस्थितीत डी कॉक पितृत्व रजेवर जाणार होता. मात्र, डिकॉकने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे, क्रिकेट चाहत्यांनी भुवया उंचवल्या आहेत.
आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी तत्काळ प्रभावाने निवृत्ती घेतल्याचं क्विंटन डी कॉकने सांगितलं. क्रिकेट दक्षिण आफ्रिका या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. क्विंटन डी कॉकच्या तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेत क्विंटनने पहिला कसोटी सामना खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने ३४ धावा केल्या. दुसऱ्या डावातही क्विंटन डी कॉकने चांगली सुरूवात केली होती. झटपट धावा करून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा त्याचा मानस होता. पण मोहम्मद सिराजने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकला आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. डी कॉकच्या चुकीमुळे चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला अन् तो बाद झाला. त्यामुळे, भारताचा विजय सोप्पा झाला. त्यानंतर, आज डीकॉकने कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली आहे.
भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात होणार आहे. अशा परिस्थितीत डी कॉकला कोरोना प्रोटोकॉल आणि इतर गोष्टींचे पालन करणे शक्य होणार नाही. मात्र, दक्षिण आफ्रिका संघासाठी त्याचे जाणे मोठ्या धक्क्याप्रमाणेच आहे. तर, पुढील कसोटी सामन्यात डीकॉकची जागा कोण घेणार, हे पाहावे लागेल.