राजकारण

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

डेहराडून: तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्याचे ११ मुख्यमंत्री म्हणून ते आजच शपथ घेणार आहेत.

पुष्कर सिंह धामी हे ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणूनही धामी यांची ओळख आहे. भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक आणि माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सर्व आमदारांनी संमती दर्शवली, असं केंद्रीय पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर सांगितलं. रावत यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी तोमर हे आज उत्तराखंडमध्ये दाखल झाले. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ते डेहराडून येथील पक्ष कार्यालयात पोहोचले. प्रदेश प्रभारी दुष्यंत गौतमही त्यांच्यासोबत होते. गेल्या चार दिवसांपासून दिल्लीपासून डेहराडूनपर्यंत बैठका आणि चर्चा सुरू होत्या. त्यानंतर रावत यांनी शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला होता.

जे.पी. नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात संविधानाच्या कलम १६४-अ चा उल्लेख करत तीरथ सिंह रावत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम १५१ प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ १ वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button