मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर परळमध्ये नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसैनिकांनी आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण केलं आहे. तसेच स्मृतीस्थळाच्या परिसरात गोमूत्र शिंपडून आणि दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं आहे. शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नारायण राणे दुपारी दिवंगत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला, असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून आणि दुधाचा अभिषेक घालून आप्पा पाटील नावाच्या शिवसैनिकाने शुद्धीकरण केलं. आप्पा पाटील हे आपल्या दिवसाची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर वंदन करुन आणि फुलं वाहून करतात. त्यानंतरच ते आपल्या कामाला सुरुवात करतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी कट्टक शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राणे विश्वासघातकी : विनायक राऊत
नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणें सारखा बाटगा आणि बाळासाहेबांशी बेईमान महाराष्टात दूसरा नेता नाही. त्यामुळे अश्या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट घेऊ देणार नाहीत असा इशारा खासदार विनायक राऊत यानी दिला होता.
…तर दर्शन घेऊन दिलं नसतं : पेडणेकर
शिवसैनिकांची भावना पहिलीच चुकीची असती तर त्यांना दर्शन घेऊन दिलं नसते. परंतु शिवसेनेच्या प्रमुखांना नतमस्तक व्हायचे आणि त्यांच्या मुलाची मुख्यमंत्री असताना वाईट शब्दात निंदा करायची तर कुठला सैनिक सहन करणार नाही. जर मुख्यमंत्र्यांना नारायण राणे यांनी येऊच नये असे वाटलं असतं तर त्यांना येऊन दिलं नस्ते. पण त्यांनी तसे केलं नाही. कारण नारायण राणे हे माजी शिवसैनिक आहेत. दर्शन घेतल्यानंतर शिवसेना प्रमुखांना अशा पद्धतीने बोलणार असाल तर हा काही स्टंट उभा केला आहे. अशा अपवित्र विचारांचे लोकं नको यामुळे शिवसैनिकांनी केलं असेल असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
विनाशकाले विपरीत बुद्धी : दरेकर
विनाशकाले विपरीत बुद्धी…खरं तर नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आले असता विरोध होता कामा नये. नारायण राणे हे बाळासाहेबांच्या हाताखाली घडलेला कार्यकर्ता आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनाही आनंदच झाला असता. मला वाटतं अशा प्रकारच्या मानसिकतेमुळं शिवसेना सहानुभूती मिळवण्यापेक्षा सहानुभूती गमावत आहे. अशी कृती सर्वसामान्य माणसाला किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडणार नाही. बाळासाहेब हे काही कुणाची खासगी मालमत्ता राहिलेले नाहीत. ज्याला आपण दैवत मानतो त्या व्यक्तीला तुम्ही विभागू शकत नाही. शिवसैनिकांची ही कृती योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची गरज : शेलार
शिवसेनेला शुद्धीकरण करण्यासाठी शुद्ध अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी विचारलाय. कारण, सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेसबरोबर सलगी केली, त्या शिवसेनेचंच मुळात शुद्धीकरण करण्याची गरज आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ज्या छगन भुजबळांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याशी सत्तेसाठी सलगी करणाऱ्या शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
——-