पुण्यात उद्यापासून निर्बंध आणखी शिथिल
पुणे : पुण्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आल्याने आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या पुरेशी असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १४ जूनपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉक करण्यात आलं आहे. पुणेकरांनाही नव्या नियमावलीत मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या नियमावलीनुसार आता सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुली राहतील. हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू राहतील आणि पार्सल सेवा रात्री ११ पर्यंत सुरू असेल. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद राहतील. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या विकेंड लॉकडाऊनबाबत पुढील शुक्रवारी १८ जून रोजी आढावा घेतला जाईल. संचारबंदी रात्री १० पासून सुरू होईल. उद्याने सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ४ ते ७ या काळात खुली असतील. आऊटडोअर स्पोर्ट्स, क्रीडांगणेदेखील सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत खुली राहतील. अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह सायंकाळी ७ पर्यंत आयोजित करायला परवानगी मिळाली आहे. ५ व्या स्तरावर असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक राहील. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र सिनेमा थिएटर आणि नाट्यगृहे मात्र बंदच राहतील
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख घसरत असला तरी म्युकरमायकोसीसचा धोका कमी झालेला नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे अनेक रुग्ण आढळले आहे. यातील २४२ रुग्णांनी आतापर्यंत म्युकरमायकोसीस या गंभीर आजारावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ६३६ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९० रुग्णांचा मृत्यू म्युकरमायकोसीसमुळे झाला आहे.