Top Newsराजकारण

गावगुंड मोदीचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करा; भाजपचे नाना पटोलेंना आव्हान

राणेंना अटक, पटोलेंना का नाही? फडणवीसांचा सवाल

मुंबई : नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. तसेच, त्यांना एक खुलं आव्हान दिलं आहे. नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे आव्हान भंडारी यांनी दिले आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना, भाजप एखाद्या मुद्द्याला धरुन राजकारण करत असल्याचे म्हटले. तसेच, देशातून नीरव मोदी, ललित मोदी देश लुटून पळून गेले त्याची भाजप नेते चौकशी करत नाहीत.

मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू केले. त्यावरुन, नानांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तसेच, ते विधान गावगुंड मोदीबद्दलच होतं, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

हा गावगुंड कोण आहे याबाबत प्रश्न विचारला असता, पोलिसांचा तपास सुरू आहे. भंडारा पोलिसांनी मोदी नावाच्या गावगुंडाला पकडलं आहे. पोलीस चौकशी करत आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटलं. काँग्रेसच्या जिल्हाप्रमुखांना भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सूचवले आहे. बिल्कुल त्यानं माझ्याविरोधात खूप प्रचार केला, मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांमुळे मला हे कळालं, ज्या पद्धतीने भाजप पंतप्रधान पदाची गरिमा खालावत आहे, त्या भाजप नेत्यांविरुद्ध, कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सांगितलंय. दरम्यान, बाकी भंडारा पोलिसांना विचारा, असेही नानांनी सूचवले आहे.

राणेंना अटक, पटोलेंना का नाही? फडणवीसांचा सवाल

मोदींबद्दलच्या वक्तव्यानंतर राज्यभरातील भाजप नेते नाना पटोलेंविरोधात आग ओकत असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पटोलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असते असे वक्तव्य नारायण राणे यांनी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती, त्यावरून फडणवीस सवाल करत आहेत. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता गप्प का आहेत ? कारवाई का करीत नाहीत ? असा सवाल त्यांनी विचारला आहे,तसेच म्हणून मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ! मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असो टालाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिलंय. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसतेय. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत. अशी टीका फडणवीसांनी केलीय. तर मला एका घटनेचे आश्चर्य वाटते, पण मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धमकी देतात आणि त्यांच्याविरुद्ध साधा एफआय आरही दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आलीय. असेही फडणवीस म्हणाले आहेत.

नानांच्या गावात एकही मोदी नाही

त्यांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झालंय. आता ते घाबरलेत. चारही बाजूनं टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत. पण कितीही पळ काढला तरी त्यांच्या मनातले विष त्यांच्या ओठावर आलंय. अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केलीय. नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये ? एखादा माणूस मी मारू शकतो असं म्हणत असेल तर तो गुन्हाच आहे ! आणि तो दाखल झाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button