नवी दिल्ली : हरिद्वार, दिल्ली व अन्य काही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत हिंदुत्ववादी नेत्यांनी मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणारी वक्तव्ये केली आहेत. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा भडक वक्तव्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करावा, तसेच दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे पत्र पाच माजी नौदल, हवाई दलप्रमुखांसह १०० मान्यवरांनी या दोघांना लिहिले आहे.
हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये माजी नौदलप्रमुख ॲडमिरल एल. रामदास, ॲडमिरल विष्णू भागवत, ॲडमिरल अरुण प्रकाश, ॲडमिरल आर. के. धोवान, माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी तसेच माजी सनदी अधिकारी, पत्रकार, वकील, अर्थतज्ज्ञ यांचाही समावेश आहे. या पत्रात म्हटले आहे की, हरिद्वार येथे झालेल्या तीन दिवसीय धर्मसंसदेत हिंदुत्ववादी नेते व साधू-संतांनी जी प्रक्षोभक भाषणे केली, त्याचा आम्ही निषेध करतो. भारतात हिंदू राज्य स्थापन करायचे असून, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा, हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा, अशी वक्तव्ये या नेत्यांनी केली. म्यानमारप्रमाणे पोलीस, लष्कर व प्रत्येक हिंदूने हत्यारे बाळगावीत व एका समुदायाचा नरसंहार करावा, असे उद्गार हिंदू रक्षा सेनाचे स्वामी प्रबोधानंद यांनी धर्मसंसदेत केले होते.
या पत्रात म्हटले आहे की, देशाच्या सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. अशा स्थितीत देशात काही मंडळी करत असलेल्या भडक वक्तव्यांमुळे बाह्यशक्तींना हातात आयते कोलीत मिळू शकेल. पोलीस असो वा लष्कर त्यांच्यामध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेला चिथावणीखोर भाषणांमुळे तडा जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.