युनिटेक ग्रुपचे प्रमोटर्स अजय चंद्रा, संजय चंद्रा यांना अटक, ईडीची कारवाई
नवी दिल्ली : ईडीकडून युनिटेक ग्रुपचे प्रमोटर अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिग प्रकरणात ही करावाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यावर पटियाला हाऊस कोर्टाने ईडीला त्यांची एक दिवस चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. अटक केल्यावर आता ईडी त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे.
यूनिटेकचे प्रमोटर्स संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांना मुंबईतून दिल्लीला आणण्यात आणले आहे. दोघांनाही यावर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबईतील कारागृहात ट्रान्सफर करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ईडीने सुप्रीम कोर्टात एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, चंद्रा तिहार कारागृहात असताना तेथून एक भूमिगत कार्यालय चालवत होता. ईडीने अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना अटक केल्यानंतर आज विशेष कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून दोघांचीही कोठडी मागण्यात येणार आहे.
युनिटेकचे प्रमोटर्स संजय चंद्रा आणि अजय चंद्रा हे दिल्लीतील तिहार तुरुंगात असताना त्यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांना भेटून कार्यालय चालवण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी एक अहवाल तयार केला होता.
दिल्ली पोलीस आणि सीबीआयने दाखल केलेल्या केसमध्ये युनिटेक ग्रुपच्या प्रमोटर्सविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. ऑक्टोबरमध्ये याच प्रकरणी युनिटेक ग्रुपचे संस्थापक रमेश चंद्रा, संजय चंद्रा यांच्या पत्नी प्रीती चंद्रा आणि कार्नोस्टी ग्रुपचे राजेश मलिक यांना अटक केली होती.