Top Newsराजकारण

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; तिखट प्रश्नांचा भडीमार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका यांनी लखीमपूरच्या घटनेवरुन पंतप्रधानांना तिखट प्रश्न विचारले आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी तुमच्या पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, असं आव्हान प्रियंका यांनी मोदींना दिलंय.

प्रियंका गांधी पंतप्रधान मोदींना तीन पानी पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी पत्रकार परिषद घेत वाचून दाखवलं. ‘लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी तुमच्या पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. असं असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यमंत्र्यांसोबत वावरताना दिसतात. लखीमपूर प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. अजय मिश्रा अजूनही आपल्या मंत्रिमंडळात आहेत. आज उत्तर प्रदेशातील कार्यक्रमात राज्यमंत्री मिश्रा यांच्यासोबत तुम्ही सहभागी होऊ नका, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

‘६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू, ३५० पेक्षा अधिक दिवसांचा संघर्ष, पंतप्रधान मोदीजी तुमच्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं. तुम्हाला कोणतीही चिंता नव्हती. तुमच्या पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करताना त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, उपद्रवी म्हटलं होतं. तुम्ही स्वत: आंदोलनजीवी या शब्दप्रयोगाचा वापर केला होता. त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांना अटक केली’, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या मागण्याही केल्या. शेतकऱ्यांना अटक केली जात होती. त्यांची हत्या केली जात होती. त्यांना मारहाण केली जात होती. तुमचचं सरकार हा अन्याय करत होतं. आज मात्र तुम्ही म्हणता कायदे मागे घेतो. मग तुमच्यावर आम्ही विश्वास कसा विश्वास ठेवायचा? तुमच्या नियतीवर विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button