पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाहीमुळे देशाच्या लोकशाहीला धोका : पृथ्वीराज चव्हाण
नाशिक: पंतप्रधान मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे. त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली असून, लोकं बेरोजगार झाले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
आताच्या घडीला देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक नजरा या उत्तर प्रदेश आणि गोवा यातील निवडणुकांवर असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकते, या शब्दांत चव्हाण यांनी निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करतात, त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत, देशाकडे मोदींचे लक्ष नाही, असा घणाघात करत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. चंद्रकांत पाटील भाजप किती लवकर सत्तेत येते, याची स्वप्न पाहत आहेत, त्यांनी स्वप्न बघत रहावी, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर, गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्यासंदर्भात राजकारण केंद्रीत झाले असून, उमेदवारी नाकारल्याने उत्पल यांच्यासह अनेक भाजप नेते, आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी बंडखोरी करत पक्षाला रामराम केला आहे.
मुख्यमंत्र्यांचं काम व्यवस्थित सुरु
मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून आणि त्यांच्या बाहेर न पडण्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत टीका होत आहे. त्यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांचं काम व्यवस्थित सुरुय, फक्त आताच त्यांचं ऑपरेशन झालंय, ते वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या फिरण्यावर काही बंधनं आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. गेल्या अधिवेशनावेळीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असा सल्ला दिलेला, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरेंकडे द्यावा, असा टोला महाविकास आघाडीला लावला होता. काही दिवसांपू्र्वीच मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत, त्यावरूनही बराच राजकीय वादविवाद झाला.