पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्याऐवजी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हजेरी लावतील. तर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. तसंच सकाळी ११ वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा हा पुतळा १८५० किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला आहे. त्याची उंची सुमारे ९.५ फूट आहे.
सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन करुन त्याची पाहणी करतील. त्यानंतर तेथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते आज होत आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जातोय.
पंतप्रधान मोदी दुपारी १२ वाजता अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते होणार आहे. नदीच्या ९ किमी पट्ट्यात १०८० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केलं जाणार असून ते पुनरुज्जीवन करणार आहे. यात नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असणार आहे.
१४७० कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प एक शहर एक ऑपरेटर या संकल्पनेवर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४०० एमएलडी असेल. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी बाणेर येथे १०० ई-बस आणि ई-बस डेपोचेही लोकार्पण करणार आहेत.
यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन होईल. या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे. जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमात आहेत. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर दुपारी १:४५ वाजता, पंतप्रधान मोदी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सुरुवात करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे मागील दोन तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री अनेक महत्वाचा कार्यक्रमांना, बैठकांना अनुपस्थित राहिले. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सध्या मुख्यमंत्र्यांना प्रवास करणं शक्य होत नसल्यामुळे ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत.
मोदींच्या पुणे दौऱ्यावर शरद पवारांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केलीय. ‘देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. एक महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. तेव्हा मेट्रोचे काम पूर्ण झाले नसल्याचे लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाट होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही’, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन टीका केली आहे.
मोदींना घालण्यात येणाऱ्या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, काँग्रेसचा विरोध
पुणे दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचा महापालिकेकडून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. पण त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचा कुठेही वापर करणं योग्य नाही, असं सांगत याप्रकारातून मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचं दाखवण्याचा प्रकार होत आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदींना हा फेटा घालण्यात येऊ नये, असं आवाहनही काँग्रेसने केलं आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा विरोध दर्शविला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु आहे. राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून काँग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.