नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलँडच्या ग्लास्गो शहरातून भारतात आगमन झाले. परदेशा दौऱ्यानंतर पहिल्यांदा मोदी बुधवारी देशातील कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या मध्ये ते जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधतील तसेच मुख्यमंत्रीसुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाले आहे. अशा जिल्ह्यांची आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली आहे.
देशातील ४० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ५० टक्केपेक्षा कमी लसीकरण झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, नंदुरबार, बुलढाना, हिंगोली, नांदेड, अकोला या जिल्ह्यांमध्ये लसीकरण ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मोदींच्या आढावा बैठकीत उपस्थित असतील. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही बैठक घेण्यात येईल. पहिल्या लसीचा डोसचे लसीकरण आणि दुसऱ्या लसीच्या डोसचे लसीकरण कमी का झाले याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. लसींच्या मात्रा उपलब्ध असताना जिल्ह्यांमध्ये लसीकरण का कमी झाले तसेच लसीकरणातील अडचणींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.
देशभरात मंगळवारपर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीचे १०७ करोड डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, मंगळवारी संध्याकाळी ३७,३८,५७४ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, भारतात ८७ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीची पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३८ टक्के लोकांना दुसरा लसीचा डोस देण्यात आला आहे. यामुळे कोरोना विरोधात लढाई अधिक तीव्र करण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यावर भर दिला जात असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.