Top Newsराजकारण

पंतप्रधान मोदी इटली आणि ब्रिटन दौऱ्यासाठी रवाना, जी-२० परिषदेत होणार सहभागी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यासाठी गुरुवारी रात्री रवाना झाले. सर्वात आधी पंतप्रधान जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणार आहेत. इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून, २०-३१ ऑक्टोबर २०२१ या काळात पंतप्रधान इटलीची राजधानी रोम आणि व्हेटीकन सिटीच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या आमंत्रणावरून, १-२ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान ते ग्रेट ब्रिटनच्या ग्लासगो इथे जाणार आहेत.

इटलीतील रोममध्ये होणाऱ्या जी-२० देशांच्या नेत्यांच्या सोळाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आणि महामारीपासून आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल, शाश्वत विकास आणि हवामान बदल, या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. कोविड महामारीचा २०२० मध्ये उद्रेक झाल्यापासून, जी-२० नेत्यांची ही पहिलीच शिखर परिषद आहे. या परिषदेत, सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि सर्व सदस्य देशांमधील आर्थिक लवचिकता आणि टिकावूपणा वाढवण्यासाठी तसेच महामारीनंतर सर्वसमावेशक तसेच शाश्वत जगाची उभारणी करण्यासाठी जी-२० देश काय करू शकतील, यावर देखील या परिषदेत विचारमंथन होईल.

विदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इटलीतील माझ्या भेटीदरम्यान, मी व्हेटिकन सिटी इथेही जाणार आहे, हीच होलीनेस पोप फ्रान्सिस यांच्या निमंत्रणावरुन मी तिथे जाणार असून, तिथले परराष्ट्र मंत्री, पिएत्रो पॅरोलीन यांचीही भेट घेणार आहे. जी-२० शिखर परिषदेच्या दरम्यान, मी विविध भागीदार देशांच्या नेत्यांनाही भेटणार असून या द्विपक्षीय बैठकीत भारतासोबतच्या द्वीपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. जी-२० शिखर परिषदेची सांगता ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यानंतर, मी ग्लासगो इथे, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक आराखडा परिषद (UNFCCC)- कोप म्हणजेच, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, (COP-26) च्या २६ व्या बैठकीत सहभागी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button