राष्ट्रवादीच्या मोजक्या नेत्यांसोबत प्रफुल्ल पटेल यांची गोपनीय चर्चा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे सर्व मंत्री, खासदारांची १ जून रोजी मुंबईत बैठक घेतल्यानंतर आता पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल कामाला लागले आहेत. मुंबईत गुरूवारी संध्याकाळी काही मोजक्या मंत्र्यांसोबत पटेल यांनी गोपनीय चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
शरद पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना पटेल यांच्या बैठकीची कल्पनाही नव्हती.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या दिवसभरातील बैठका आटोपल्यानंतर संध्याकाळी सह्याद्री गेस्टहाऊसवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती होती. मुंबईत असूनही पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिका, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे या बैठकीला उपस्थित नसल्याचे समजते. पटेल यांनी घेतलेल्या पक्षाच्या निवडक नेत्यांच्या बैठकीची कल्पना अनेकांना नव्हती, त्यामुळेच एखाद्या महत्वाच्या विषयावर बैठक घेतल्याने आता आगामी काळात पक्षाची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
सध्या मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचे आरक्षण, ओबीसींचे आरक्षण आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने सर्वच समाजातील घटक ठाकरे सरकारवर नाराज आहेत. तर ओबीसींचे आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण या विषयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने -सामने आली आहे. सरकारच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे. काँग्रेसचे हायकमांड, अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागासवर्गीय आणि ओबीसींचे संरक्षण केले पाहिजे, असे पत्र पाठवले होते. मात्र, या पत्राची दखलही मुख्यमंत्री ठाकरे यांनी न घेतल्याने काँग्रेसचे काही मंत्रीही नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या निवडक मंत्र्यांची बैठक सरकारमध्ये, सारे काही आलबेल नाही, हे सांगण्यास पुरेसे आहे.