मुंबई : फिझा आणि मिशन कश्मीर यासारख्या चित्रपटाचे निर्माते आणि सेल्स मार्केटिंग क्षेत्रातील गुरू प्रदीप गुहा यांनी शुक्रवारी मुंबईत कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्यावर यकृताच्या एडव्हान्स (स्टेज ४) कॅन्सरसाठीचे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी पापिया आणि मुलगा संकेत असा परिवार आहे. गुहा यांच्या निधनाने बॉलिवुड, टेलिव्हिजन जगत, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रदीप गुहा यांना श्रद्धांजली दिली आहे.
प्रदीप गुहा टाईम्स ऑफ इंडिया समुहासाठी सलग तीन दशके रिस्पॉन्स डिपार्टमेंटचे प्रमुख होते. टाईम्समधून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुभाष चंद्रा यांच्या झी टेलिफिल्म्स येथे त्यांनी सीईओ म्हणून २००५ साली जबाबदारी सांभाळली. २००५ मध्येच झी समुह आणि भास्कर समुहाच्या संयुक्त असलेल्या डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे ते सल्लागार होते. सध्या त्यांच्याकडे ९ एक्स मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी आहे.
प्रदीप गुहा यांच्यावर याआधी मुंबईतील एका मल्टीस्पेशालिस्ट डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. पण त्यांच्या तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेल्याची माहिती आहे. गेल्या ७२ तासांमध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये कोणतीही सुधारणा होऊ शकली नाही. अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटूंबीयांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार म्हटले आहे की, आम्हाला प्रदीप गुहा यांच्या निधनाची बातमी सांगताना खूपच दुःख होत आहे. पण covid-19 महामारीचे संकट पाहता मर्यादित स्वरूपात कुटूंबीयांनाच हजर राहण्याचे परिवाराने आवाहन केले आहे. लवकरच श्रद्धांजली सभेची तारीख जाहीर होईल असे, पत्नी पपिया आणि मुलगा संकेत यांनी नमुद केले आहे.
फिजा चित्रपटातून त्यांनी ऋतिक रोशन रोशनला बॉलिवुडमध्ये ब्रेक दिला. तसेच सुभाष घई यांच्या गोरेगाव फिल्म सिटी येथील व्हिसलिंग वुड्सचेही ते संचालक होते. प्रदीप गुहा यांच्या टाईम्स ऑफ इंडियामधील सेवाकाळातच ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाल्या. तर सुश्मिता सेन या मिस युनिव्हर्स झाल्या. त्यांच्या बॉलिवूडमधील चांगल्या कनेक्शनमुळेच मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये लारा दत्ता, दीया मिर्जा, रितेश देशमुख, शेखर कपूर, मनोज वाजपेयी यासारख्या अनेक नेत्यांनी प्रदीप गुहा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.