नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून देशात मोठा चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नीट पीजी’ परीक्षेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने परीक्षा ६ ते ८ आठवडे पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आधी १२ मार्च रोजी होणार होती, पण आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
‘नीट पीजी’ परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. ‘नीट’ परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी याचिका अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत मेडिकल इंटर्नशिपचा हवाला दिला होता. अनेक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली नाही. ते म्हणाले की, दोन बॅचला एकाचवेळी सर्व जागा कशा देता येतील. त्यामुळे १२ मार्च रोजी परीक्षा घेणे योग्य नाही.
परीक्षा पुढे ढकलण्याची अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ‘नीट पीजी’ समुपदेशनाच्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२१ च्या तारखा या वर्षीच्या परीक्षेच्या तारखेसोबत येत आहेत. अशा परिस्थितीत आगामी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. विद्यार्थ्यांनी ही मागणी सोशल मीडियावर मांडली आणि आरोग्य मंत्रालयाकडे या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सातत्याने केली. यासाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती, त्यावर कोर्टानेही विचार करण्यास मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त मानून आरोग्य मंत्रालयाने आता परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.