मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सुनील मानेंना अटक
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात क्राईम ब्रांचचे माजी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. याआधी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अटक करण्यात आली आहे.
सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय आहे. ३ मार्च रोजी सचिन वाझे यांच्या कार्यालयात सुनील माने, विनायक शिंदे आणि सचिन माने यांची बैठक झाली होती. या बैठकीत मनसुखच्या हत्येची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती. या भेटीचे पुरावे एनआयएला मिळाले आहेत. कांदिवली क्राईम ब्रँच येथून तावडे नावाने मनसुख हिरेनला ४ मार्च रोजी रात्री फोन करून घोडबंदर रोडवर बोलावणारी व्यक्ती सुनील माने असावी असा संशय देखील एनआयएला आहे.
मनसुख हिरेन प्रकरणात आणखी काही आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडार असून लवकरच त्यापैकी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सुनील माने ही तिसरी अटक असून या पूर्वी बडतर्फ पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना एटीएसने अटक करून एनआयएकडे सोपवले होते.