राजकारण

तक्रार खोटी, पतीचे नावही खोटे; संजय राठोड यांना क्लीनचीट

मुंबई : माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आपोपाप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. यवतमाळ पोलिसांनी ही क्लीनचीट दिलेली आहे. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुत केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असे यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.

संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची ट्विटमध्ये खालील माहिती दिली होती. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले होते. मात्र, आता हे पत्र आणि पत्रात नमूद करण्यात आलेली महिला यांचा एकमेकांशी संबंध नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button