पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस टोचून घेतली. अंतिम टप्प्याच्या चाचण्या होण्यापूर्वीच या लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेतविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.
देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी आजपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु होणार आहे. 1 मार्चपासून देशातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस देण्याचे सरकारने जाहीर केले होते. याशिवाय, खासगी रुग्णालयातही 250 रुपयांत कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच यासाठी परवानगी दिली.
कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.
तुम्हाला आता लस मिळू शकते का?
सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.
लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अॅपचा अॅक्सेस नाही.