पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवस बांग्लादेशच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. 26 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदी यांचं विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर लॅन्ड होईल. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना 19 तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान एअर पोर्टवर परेडचं निरीक्षण करतील. पुढे दोन्ही देशांचे पंतप्रधान सलामी मंचावर जातील.
ढाका एअरपोर्टवरुन पंतप्रधान मोदींचा ताफा थेट बांग्लादेशच्या राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाईल. तिथे पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. तसंच त्यांची आठवण म्हणून एक रोपटंही लावतील. शहीद स्मारकावरुन निघाल्यानंतर पंतप्रधान पॅन पॅसिफिक सोनारगाव हॉटेलमध्ये पोहोचतील. तिथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोंदीच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसंच मोदींच्या स्वागताची जोरदार तयारीही करण्यात आली आहे.
संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान मोदी नॅशनल परेड ग्राऊंडवर पोहोचतील. तिथे पुन्हा एकदा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना त्यांचं स्वागत करतील. ढाका इथल्या नॅशनल परेड ग्राऊंडवरच स्वातंत्र्याच्या 50 व्या सोहळाचे राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचं आगमन झाल्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर विविध धर्मग्रंथांचं वाचन होईल. त्याचबरोबर 50 व्या स्वातंत्र्यदिनाचं एक थिम साँगही असेल आणि काही व्हिडीओही दाखवले जातील.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांग्लादेशचे लिबरेशन ऑफ अफेयर्सचे मंत्री मुजम्मिल हक यांचं स्वागताचं भाषण होईल. त्याचबरोबर पंतप्रधान शेख हसीना यांच्या भगिनी रेहाना सिद्दीकी यांचंही संबोधन होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचं सबोधन होईल. मान्यवरांची भाषणं झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांचे दाखले सांगणारा कार्यक्रम होणार आहे.