देशातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल दराने शंभरी ओलांडली !
नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोना संकटाचा काळ असताना दुसरीकडे इंधनदरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० पेक्षा अधिक वेळा इंधन दरवाढ केली आहे. सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर ठरत असल्याचे सांगत आहे. तसेच इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम, लडाख, पुडुचेरी, पश्चिम बंगाल या १७ राज्यांमध्ये पेट्रोल दराने शंभरी गाठलेली आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट झाल्यानंतर नव्याने पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेल्या हरदीपसिंग पुरी यांना कंपन्यांनी पहिल्याच दिवशी इंधन दरवाढीची सलामी दिल्याचे समजते. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गुरुवारप्रमाणेच कायम आहेत. याआधी सलग दोन दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ शकतात. तसेच इंधनावरील कर कमी करण्याचा सल्लाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे.
देशभरात गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती. पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये ९ पैशांची वाढ झाली होती. बुधवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी वधारले होते. शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०६.५९ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १००.५६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.३७ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १००.६२ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०८.८८ रुपये इतका वाढला आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९७.१८ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत ९४.१५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६५ रुपये प्रती लीटर झाला आहे.
ओपेक समुहाने पुढील काही महिन्यातील उत्पादनाच्या भूमिकेबाबत स्पष्टता न दिल्याने तेलाची घसरण सुरूच आहे. तीन दिवसांच्या बैठकीनंतर तेल निर्यात करणाऱ्या समुहाने चर्चा थांबवली. याचा परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याच्या शक्यतेमुळे आठवड्याच्या सुरुवातीला तेलाचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये डेल्टा संक्रमणात वाढ झाल्याने, महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या निर्बंधांमुळेही तेलाच्या दरांवर दबाव आला, असे म्हटले जात आहे.