Top Newsराजकारण

पेट्रोल, डिझेल दरवाढ आपल्या भल्यासाठी; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच करण्यात येत आहे. फक्त आपल्या ते लक्षात येत नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लगावला आहे. देशात आणि मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर वारंवार टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास २ या अंतिम अहवालाच्या प्रकाशनादरम्यान बोलत होते.

मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास २ या अंतिम अहवालाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्याक्रमादरम्यान संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत केंद्रावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री म्हणाले सार्वजनिक वाहतुकीचा टक्का घसरला हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आपण दरवाढीवरुन केंद्रावर टीका करतो परंतु हे आपल्या हिताचे आहे. आपल्या भल्यासाठीच केंद्र सरकारने भाववाढ केली आहे. फक्त ते आपल्याला कळत नाही. इंधन परवडले नाहीतर प्रवासी तुमच्याकडे येतील की नाही? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी हे आपल्या हितासाठी असल्याचे म्हणत केंद्रावर निशाणा साधला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एमएमआरडीएच्या कामांना अधिक गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. शहरांचा विकास करताना आपण चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देतो पण रस्ते एकदा बांधले की बांधले, आपण त्यासाठी काही करीत नाही. कुणालाही गर्दीत आपली गाडी चालविण्याची हौस नाही. वाहतूक व्यवस्था ही शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखी असून रस्ते पूर्णपणे खड्डे मुक्त, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी व कार्यक्षम तसेच वेगवान असणे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात बसेस, रेल्वे मधील प्रवासी संख्या घटली असेल पण आता परत वाढत चालली आहे असा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधा वाढवतांना पर्यावरणाला मारू नका. आपण खरोखरच किती आणि कसा नियोजनबद्ध विकास केला हे पाहायला पाहिजे.

जिथे असा विकास झालेला नाही तिथेही आपल्याला कर्तव्य म्हणून पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा सुविधा द्याव्यात लागतात. आता मुंबईतली मेट्रो स्थानके पहिली म्हणजे आपण मुंबईत आहोत की दुसऱ्या देशात आहे असे वाटतं. कुठल्याही त्रास आणि अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचे स्वप्न एमएमआरडीएच्या या नव्या अभ्यासातून पूर्ण होणार आहे अशी मला खात्री वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नागरी सुविधांवर लक्ष द्यावे : एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेरिकेचे उदाहरण देऊन सांगितले की, आपले रस्ते आपली खरी श्रीमंती दाखवतात. मुंबई आणि मुंबई महानगरच नव्हे तर राज्यात सर्वत्र उत्तम रस्ते असणे यावर प्राधान्य देण्यात आले असून ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी रस्ते खराब होऊ नयेत म्ह्णून ते काँक्रीटमध्ये बांधण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीए कडून लोकांच्या अपेक्षा वाढत असून महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्तांनी देखील नागरी सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळतील हे पाहणे गरजेचे आहे असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सर्व करतांना पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

ताळमेळ व शिस्त हवी : आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, केवळ शहरांतर्गत परिवहन आणि वाहतूक व्यवस्थेचा असा विचार न करता अगदी सूक्ष्म नियोजन करून वॉर्ड पातळीवर याचे नियोजन हवे. वाहतुकीच्या बाबतीत मिसिंग लिंक्स कुठल्या आहेत ते पहिले पाहिजे. मुंबई, ठाणे या शहरांची भविष्यात वाढ आता अवघड असली तरी आता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गगनचुंबी अशी उभी आणि उंच वाढ सुरू झाली आहे.

लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्याला केवळ नवनवीन रस्त्यांचे नियोजन नव्हे तर उत्तम पर्यायी व जोड रस्ते यांचेही नियोजन करावे लागणार आहे. मुंबईत आज ३५०० बसेस आहेत पण १००० बसेस धावू लागतील तेव्हा वाढीव लोकसंख्येचा विचार करून आपण सर्वाना ही सुविधा देण्याचे समाधान मिळेल. याव्यतिरिक्त आपण इलेक्ट्रीक किंवा आणखी कोणते पर्यावरणपूरक इंधन वापरतोय हा देखील कळीचा मुद्दा आहे असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, ही सर्व व्यवस्था शाश्वत असली पाहिजे आणि यात चांगला ताळमेळ व शिस्त हवी तरच ती परिणामकारक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button