पॅट कमिन्स, आंद्रे रसेलची झुंजार खेळी, तरीही चेन्नईचा १८ धावांनी विजय
मुंबई : रंगतदार झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर १८ धावांनी मात केली आहे. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी २२१ धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला सर्वबाद २०२ धावाच करता आल्या. कोलकाताकडून पॅट कमिन्सने शानदार नाबाद ६६ धावा केल्या. तर आंद्रे रसेलने ५४ धावांची झंझावाती खेळी केली. दिनेश कार्तिकने ४० रन्स केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक ४ तर लुंगी एन्गिडीने ३ विकेट्स घेतल्या. चेन्नईचा हा सलग तिसरा विजय ठरला. तसेच चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
कोलकाताच्या संघ ११२ धावांवर असताना आंद्रे रसेल (५४) बाद झाल्यानंतर संघाला ८.४ षटकात विजयासाठी १०९ धावांची गरज होती. तेव्हा मैदानात आलेल्या पॅट कमिंसने सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार केला. कमिंसने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. परंतु त्याला संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयश आलं.
चेन्नईने आजच्या सामन्यातील विजयासह आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नई सुपरकिंग्सचे गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईला दिल्ली कॅपिटल्सने धूळ चारली होती. परंतु त्यानंतर चेन्नईने चांगलं कमबॅक करत पंजाब, राजस्थान आणि आज कोलकाता या तीन संघांना पराभूत केलं आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ तीन सामने खेळला होता. या तीन सामन्यांमध्ये त्यांना दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना चेन्नईच्या संघाने जिंकला आणि त्यांचे सहा गुण झाले आहे. गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचेही समान सहा गुण आहेत. पण चेन्नईचा नेट रनरेट हा आरसीबी आणि दिल्लीपेक्षा जास्त असल्याने त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.
चेन्नईने या सामन्यात केकेआरपुढे २२१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची पहिल्याच पॉवर प्लेमध्ये ५ बाद ३१ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांची चांगलीच जोडी जमली. रसेलने यावेळी २१ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. पण अर्धशतक झळकावल्यावर रसेलला जास्त काळ खेळपट्टीवर ठाण मांडता आले नाही. सॅम करनचा एक चेंडू सोडण्याच्या नादात रसेल बाद झाला आणि केकेआरला मोठा धक्का बसला. रसेलने यावेळी २२ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली.
रसेल बाद झाला असला तरी त्यानंतर पॅट कमिन्सने चेन्नईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली होती. कार्तिक बाद झाल्यावरही कमिन्सने आपली बॅट म्यान केली नाही. कमिन्सने दमदार फटकेबाजी केल्यामुळेच हा सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला होता. पण अखेरच्या षटकात दुहेरी धाव घेताना प्रसिध कृष्णन धावचीत झाला आणि चेन्नईने १८ धावांनी सामना जिंकला. कमिन्सने यावेळी ३४ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
फॅफ ड्यु प्लेसिसच्या नाबाद ९५ धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २२० धावा फटकावल्या होत्या. ऋतुराजने यावेळी ४२ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६४ धावांची धडेकाबाज खेळी साकारली. ऋतुराज आणि फॅफ यांनी यावेळी ११५ धावांची सलामी दिली. फॅफने अखेरच्या षटकापर्यंत दमदार फलंदाजी केली, पण त्याचे शतक फक्त पाच धावांनी हुकले.