मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारु सुरु आहे.
पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया, अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे घर, अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर धाडी का?
आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती आहे.
माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दुख आहे, ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असे अजित पवार म्हणाले.