फोकस

खंडणी उकळण्यासाठी परमबीर सिंगांचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’ !

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकार्‍यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात कुख्यात गुंड छोटा शकीलच्या आवाजाची ऑडिओ क्लिप एसआयटीच्या हाती लागली आहे. तर ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांचा समावेश असून त्यात कुख्यात गुंड रवी पुजारी आरोपी आहे. या दोन्ही गुन्ह्यात अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल्यामुळे पोलीस गुंडांशी हात मिळवणी करून खंडणी उकळत होते की, काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात संजय पुनामिया, सुनील जैन या दोन खासगी व्यावसायिकांसोबत परमबीर सिंह, गुन्हे शाखेचे माजी पोलीस आयुक्त अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे तसेच गुन्हे शाखेचे इतर अधिकार्‍यांविरुद्ध खंडणी, फसवणूक, बोगस कागदपत्रे तयार करून जमीन बळकावणे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले आहे. एसआयटीला तपासात नुकतीच एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. ही ऑडिओ क्लिप अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणार्‍या छोटा शकील याच्या आवाजाची असल्याचे समोर आले आहे. छोटा शकील हा संजय पुनामिया याला फोन करून धमकावत असल्याचे या ऑडिओ क्लिपवरून समोर येत आहे. श्यामसुंदर अग्रवाल याच्याबरोबर काय ते सेटल कर नही तो कराची से रॉकेट मारेगा, अशी धमकी छोटा शकील संजय पुनामियाला देत असल्याचे समजते. या ऑडिओ क्लिपनंतर श्यामसुंदर अग्रवाल याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या ऑडिओ क्लिपमधील आवाज छोटा शकीलचाच असल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले असले तरी त्या आवाजाचे नमुने आणि मोक्का न्यायालयात जमा असलेल्या शकीलच्या आवाजाचे नमुने पुन्हा एकदा तपासून बघण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या ऑडिओ क्लिप संदर्भात श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, ठाण्यातील कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे, डीसीपी देवराज, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे सह सुमारे ३५ जणांविरुद्ध खंडणी, फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात मिळून ३५ आरोपी असून ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एकूण २८ आरोपींचा समावेश असून त्यात कुख्यात गुंड रवी पुजारी याचा देखील समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button