राजकारण

परमबीर सिंग यांनी केली ३.५ कोटींची खंडणी वसुली; आता क्रिकेट बुकीचा ‘लेटर बॉम्ब’!

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे परमबीर यांच्या अडचणींमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनंतर आता एका क्रिकेट बुकीनं परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. यापूर्वी अनुप डांगे आणि अकोल्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं परमबीर सिंग यांच्या विरोधात गंभीर आरोप करणारी पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहिली होती.

परमबीर सिंग आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पाठोपाठ एक लेटरबॉम्ब समोर येत आहेत. आता तर चक्क क्रिकेट बुकी सोनू जलाल यानं परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी खंडणी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालनं केला आहे. विशेष म्हणजे सोनू जालानने याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली आहे.

सोनू जलाल यानं लिहिलेल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी २०१८ मध्ये ३ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली केली होती, असा आरोप केला आहे. मकोका गुन्हा लावून खंडणी वसूल केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या पत्रामध्ये प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, असं पत्रात म्हटलं आहे.

या प्रकरणाची दखल गृहखात्याने तत्काळ घेतली असून डीजीपी ऑफिसमधून हे प्रकरण स्टेट सीआयडीला वर्ग केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आणखी प्रकरणांमध्ये परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे परमबीर सिंग यांनी थेट पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात रिट याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद आता आयपीएस विरुद्ध आयपीएस असा सुरू झालाय. एकामागोमाग एक अनेक अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर आरोप करत आहेत. तर परमबीर यांनीही अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटींच्या वसुलीचं प्रकरण मागे घेण्यास दबाव टाकला जात असल्याचा दावा केला आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे. परमबीर सिंह यांनी संजय पांडे यांच्यावरच प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.

परमबीर यांच्या बदलीनंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटींच्या वसुलीची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चिघळत गेलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. मात्र त्यानंतर आता परमबीर यांच्या आधीच्या वसुली प्रकरणाच्या अनेक तक्रारी समोर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं परमबीर सिंग अडचणीत आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button