राजकारण

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सरासरी ६८ टक्के मतदान

सोलापूर: कोरोनासारख्या संकट काळातही राजकीय नेत्यांच्या सभा, आरोप-प्रत्यारोप आणि दाव्या-प्रतिदाव्यांनी गाजलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. त्यात अंदाजे ६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रभावाखाली झालेल्या मतदान प्रक्रियेत सकाळपासून मतदानाचा वेग मंद होता. मात्र तो दुपारनंतर वाढत गेला. सायंकाळी काही गावांत त्यात आणखी उत्साही वाढ झाली.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक लागली होती. राज्यात अन्यत्र कुठेच निवडणूका नसल्याने विधानसभेची ही पोटनिवडणूक महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांनी आणि राज्यात विरोधक असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची केली होती. याचे कारण म्हणजे, राज्यात बेरजेचे राजकारण करत अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे अशीच ही लढत झाली.

ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्र्यापासून प्रवक्ते अमोल मेटकरी यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी गाजवली. त्यांच्या प्रत्त्युरादाखल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाळा भेगडे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गाजवली.

राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या सहानुभूतीचा विचार करुन राष्ट्रवादीने त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांना मैदानात उतरविले होते, तर त्यांच्या विरोधात भाजपने मंगळावेढ्याचे उद्योजक आणि दोन निवडणुकांचा अनुभव असलेले समाधान आवताडे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले होते. स्थानिक पातळीवर साखर पट्ट्यातील ही निवडणूक आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्यासाठी तर कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी गावपातळीवर यंत्रणेची धुरा सांभाळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button