मुंबई : आयपीएलच्या १४ व्या मोसमातील १६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सवर १० गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. देवदत्त पडीक्कलच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय साकारला. या विजयासह आरसीबीने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.
राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी १७८ धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही गडी न गमावता १६.३ षटकात पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक नाबाद १०१ धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली. बंगळुरुचा या मोसमातील हा सलग चौथा विजय ठरला.
या सामन्यापूर्वी तीन विजयांसह आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान गुण होते, पण नेट रनरेट जास्त असल्यामुळे चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला होता. आजच्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. हा आरसीबीचा चौथा विजय ठरला आणि त्याचबरोबर गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. आठ गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, पण त्यांच्या फलंदाजांना यावेळी सूर गवसला नाही. राजस्थानची ३ बाद १८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर संजू सॅमसनने काही काळ धडाकेबाज फलंदाजी केली खरी, पण षटकार ठोकल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. संजूने यावेळी दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २१ धावा केल्या. शिवम दुबे आणि रायन पराग यांची चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. पण यावेळी पराग २५ धावांवर आऊट झाला आणि ही त्यांची भागीदारी संपुष्टात आली. पराग बाद झाला असला तरी शिवम चांगली फटकेबाजी करत होता. पण यावेळी शिवमचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. शिवमला यावेळी केन रीचर्डसनने बाद केले. शिवमने यावेळी ३२ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. त्यानंतर राहुल तेवातियाने यावेळी २३ चेंडूंत ४० धावा केल्यामुळे राजस्थानला १७७ धावा करता आल्या.
पडीक्कलची अफलातून कामगिरी
देवदत्त पडीक्कलने या सामन्यात ५२ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याचबरोबर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतक करणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे. २० वर्षे २८९ दिवस वय असलेल्या देवदत्तने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक फटकावलं आहे. त्याच्या आधी दोन फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.
मनीष पांडे हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या दुसऱ्याच मोसमात पांडेने शतक ठोकलं होतं. तेव्हा त्याचं वय केवळ १९ वर्ष २५३ दिवस होतं. ऋषभ पंत हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा युवा फलंदाज आहे. त्याने आयपीएल २०१८ मध्ये शतक फटकावलं होतं. तेव्हा त्याचं वय केवळ २० वर्ष २१८ दिवस इतकं होतं. या पंक्तीत आता देवदत्त पडीक्कलनेदेखील स्थान मिळवलं आहे.
आयपीएलमध्ये ‘विराट’ कामगिरी
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी. या खेळीसह कोहलीने विराट पराक्रम केला आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटला या सामन्याआधी ५१ धावांची आवश्यकता होती. विराटने आधी ३४ चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे अर्धशतक त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ४० वं अर्धशतक ठरलं. अर्धशतकानंतर विराटला ६ हजार धावांसाठी अवघ्या १ धावेची आवश्यकता होती. तेव्हा विराटने चौकार खेचला. यासह विराटने ६ हजार धावा पूर्ण केल्या.
या कामगिरीसह विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावे आता १९६ सामन्यांमध्ये ६ हजार २१ धावा झाल्या आहेत. विराटनंतर या यादीत चेन्नईच्या ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने ५ हजार ४४८ धावा चोपल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ‘गब्बर’ शिखर धवन आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. तर पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडिन्सचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आहे.