केरळ काँग्रेसचे मोठे नेते पी.सी. चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. काँग्रेसमधून सातवेळा केरळात खासदार होते. 6 दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचं असेल तिथं आम्ही काँग्रेससोबत आहोत. आमचा इतर राजकीय पक्षांशी संपर्क सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्राची दडपशाही सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. दिल्लीत संध्याकाळी खा. शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती.
प्रादेशिक पक्षांसाठी चांगला मंच तयार करण्याचा प्रस्ताव असल्यास त्यावर विचार करु, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारचं काम सुरु आहे असेही खा.पवार यावेळी म्हणाले. केरळमध्ये राष्ट्रवादी काही वर्षांपासून एलडीएफला पाठिंबा देत आहे. डाव्या आणि लोकशाहीवादी पक्षांची युती होत आहे. केरळ काँग्रेसचे मोठे नेते पी सी चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत पी.सी.चाको यांचं पक्षात स्वागत करतो, असं खा. पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आनंद होत आहे. शरद पवार देशातील मोठे राजकीय नेते आहेत. काँग्रेसमध्ये अनेक अडचणी आल्यानं राजीनामा दिला. विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. शरद पवार यांचा अनुभव, त्यांचा संपर्क देशातील विरोधी पक्षाला एकत्र करण्यास उपयोगी ठरेल. त्यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास मिळतोय याचा आनंद आहे. असे यावेळी पी सी चाको म्हणाले. तर चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे केरळाच्या विधानसभा निवडणुकीत NCP ला राजकीय ताकद मिळणार आहे, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.
ही पत्रकार परिषद गाजवली ती मोरांनी. दिल्लीत जिथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांपेक्षा मोरांचाच आवाज जास्त येत होता. या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी केली. त्यांनी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच मोरांचे आवाज लक्ष वेधून घेत होते. मोरांचा आवाज इतका येत होता की, एकवेळ प्रफुल पटेल काय बोलत आहेत, हेच ऐकायला येत नव्हतं.
पवारांची उद्धव ठाकरे, अनिल देशमुख यांना शाबासकी
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगले काम केले आहे अशी शाबासकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या प्रकरणातील संशयित एपीआय सचिन वाझेंमुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असाही खुलासा शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी या संपुर्ण प्रकरणात उत्तम काम केले असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. सरकार चालवताना काही अडचणी येतात परंतु चर्चा करुन तोडगा काढण्यात येतो असे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे आणि सरकारमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
सचिन वाझे प्रकरणाबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तरात पवार म्हणाले की, एका पोलिस निरीक्षकामुळे सरकारचे धोरण बदलत नसते. एपीआय सचिन वाझे प्रकरणात २ राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. तपास सुरु असल्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणे योग्य वाटत नाही. परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांची चौकशी आणि तपास योग्य दिशेने सुरु आहे. कोणत्या अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असेल. किंवा दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल तर तपास यंत्रणा योग्य कारवाई करतील. राज्य सरकारही त्यांच्यावर कडक कारवाई करेल. एनआयएच्या तापासात काहीही दुमत नसल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. राज्याच्या कामांबद्दल आणि भाजपशी कोणता नेता कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार यावरही चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात योग्य कामकाज सुरु आहे. राज्य सरकार चालवताना अनेक अडचणी येतात. परंतु चर्चा केल्यावर त्यावर तोडगा निघतो. सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणात तसेच अनेक प्रकरणात योग्य काम केले आहे. त्यांच्या कामकाजावर शंका नसल्याचेही राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.