मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते लोक इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडून लोकांची दिशाभूल करत आहेत. ज्यांनी भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवली तेच आता भारतमातेला विकायला निघाले आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाचे उद्घाटन पुण्यातील केसरी वाड्यातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पटोले पुढे म्हणाले की, इंग्रजांचे सरकार जुलमी, अन्यायी अत्याचारी होते, स्वातंत्र्यचळवळ मोडून काढण्यासाठी त्यांनी अनन्वीत अत्याचार केले पण लोक डगमगले नाहीत. गो-या पोलीसांच्या गोळ्यांनाही घाबरले नाहीत. ते परकीय होते पण आत्ताचे केंद्रातील सरकार इंग्रज सरकारपेक्षा काही वेगळे नाही. इंग्रज शासक व आत्ताचे सत्ताधारी सारखेच आहेत. तेही जुलुम करायचे आणि हेही तेच करत आहेत. लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकार विरोधात ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’? असा जळजळीत लेख लिहिला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. आजचे सरकारही तेच करत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवणा-यांचा आवाज दाबला जात आहे. प्रसारमाध्यमांचीही मुस्कटदाबी केली जात आहे.जो सरकारच्या विरोधात बोलेल, लिखाण करेल त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे. जेथे अन्याय दिसेल त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. लोकशाहीच्या चार स्तंभातील न्यायपालिकेची अवस्था काय करून ठेवली आहे हे आपण पहातच आहोत. स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदु मुस्लिम असा भेदभाव कोणी केला नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग घेतला परंतु सध्या हिंदू मुस्लिम भेदभाव करून समाजात व्देष पसरवण्याचे काम केले जात आहे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचे काम सुरू आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कॉंग्रेसच्या अमुल्य योगदानाचा संदर्भ देऊन पटोले म्हणाले की, “स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसने जुलमी, अत्याचारी व हुकूमशाही राजवटीविरोधात मोठा लढा दिला. सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या जहाल व महात्मा गांधींच्या मवाळ अश्या दोन्ही मार्गांनी या लढ्यात असंख्य स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु असलेली ब्रिटिश राजवटीची हुकूमशाही प्रेरणादायी चळवळीच्या माध्यमातून उलथवून टाकून कॉंग्रेसने नंतर या देशात लोकशाही व धर्मनिरपेक्ष व्यवस्था रुजवली. पंडित नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देश उभारणीत मोठे योगदान दिले. आजच्या विद्यमान केंद्र सरकारने देशाच्या या एकात्मिक व्यवस्थेला व लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व नवीन पिढीला कॉंग्रेसचा इतिहास कळावा म्हणून ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत पदार्पण करत असताना संपूर्ण राज्यभर राबविले जाणार आहे. या अभिमानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा’, असे आवाहन पटोले यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे हुतात्मा राजगुरु, नारायण दाभाडे, शंकरराव मोरे, जेधे, टिळक, मर्चंट, फडके आदी स्वातंत्र्यलढ्यातील कुटुंबीयांच्या वंशजांचा तसेच उषा देसाई, रामभाऊ जोशी, वैद बंधू या स्वातंत्र्यसैनिकांचा नाना पटोलेंच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसचे योगदान दर्शविणाऱ्या एका शॉर्टफिल्मचे अनावरण करण्यात आले. आज १ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागात तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रदेश कॉंग्रेसतर्फे हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. शरद रणपिसे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, शाम पांड़े, रोहित टिळक, या उपक्रमाचे राज्य समन्वयक प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व विनायक देशमुख, विजय अंभोरे, एनएसयुआयचे अमिर शेख, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक केले तर विनायक देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.