राजकारण

नवी पिढीच बदल घडविणार : जयंत पाटील

मुंबई : आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात… प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वसई येथे व्यक्त केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरूवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोकण विभागातील वसई येथून केली. यावेळी त्यांनी वसई-विरार कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. आपला पक्ष हा आदरणीय शरद पवारसाहेबांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मला तुमच्याकडून चांगला निकाल पाहिजे. बाहेर शत्रू मोठा आहे, त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा, असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी बैठकीत केले.

वसई-विरार, नालासोपारा हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी इथल्या लोकांनी मोठे योगदान दिले आहे. या भागात सर्व समाजाचे, सर्व भाषिक लोक राहतात, त्यामुळे इथे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करावं लागेल असे स्पष्ट मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. तसेच, याठिकाणी किल्ला लढवणे सोपे नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत हे कौतुकास्पद आहे. हळूहळू का होईना येथे पक्ष वाढेल, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button