![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/12/onion-farmer.jpg)
रडवणं हा कांद्याचा गुणधर्म. कांदा कधी ग्राहकाला रडवतो, तर कधी शेतकर्यांना. गृहिणींना तो जास्त काळ रडवितो. कारण कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येतं. कांद्याचा हा जसा रडविण्याचा गुणधर्म आहे, तसाच तो मूर्च्छिताना शुद्धीवर आणण्याचं काम करतो. याच कांद्याचा उत्पादन खर्च सरासरी ऩऊ रुपये आहे. सरकारनं संसदेत जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणं कांद्याला किमान साडेतेरा रुपये भाव मिळायला हवा; परंतु सध्या कांद्याच्या भावाने शेतकर्यांची चेष्टा चालविली आहे.
कांद्याचा समावेश अत्यावश्यक वस्तू कायद्यात होता, तेव्हा त्यावर धोरणात्मक बाब म्हणून टीका व्हायची. अत्यावश्यक वस्तू कायद्यातून त्याला काढलं, तरी कांद्याच्या भावात सुधारणा झालेली दिसली नाही. देशाला एक कोटी साठ लाख टन कांदा लागतो आणि उत्पादन होतं दोन कोटी टनांहून अधिक. कांदा कधी हात देतो, तर कधी हातातलं काढून घेतो; परंतु कमी काळात आणि कधी ना कधी पैसा मिळवून देणारं पीक म्हणून कांद्याचा उल्लेख होतो. कांद्यामुळं जमिनीत नायट्रोजनचं प्रमाणही वाढतं. सरकारनं बाजार हस्तक्षेप योजना सुरू केली असली, तरी तिचा फार कमी वेळा वापर झाला आहे. कांदा हे अतिशय संवेदनशील पीक आहे. भाव पडले, की खासदार कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेत जातात आणि भाव वाढले, की माध्यमं संतप्त जनतेच्या प्रतिकिया दाखवितात. भारतात कांद्यावर प्रकिया करण्याचे उद्योग हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. कांदा निर्यातीलाही मर्यादा आहेत. १५-२० लाख टनांपेक्षा जास्त कांदा निर्यात होत नाही. त्यातही पावसाळी कांदा तर निर्यात होऊ शकत नाही. सुमारे दहा टक्क्यांहून कांदा अधिक कांदा आरणीतच सडून जातो. त्यामुळे त्याचा शेतकर्यांना बसणारा फटका वेगळाच. कांदापुराणाचं आख्यान लावायाचं कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याविषयी दररोज दोन-तीन बातम्या येत असून, त्याचा आशय पाहिला, तर शेतकरी आत्महत्या का करतो, याचं कारण लक्षात येईल.
पाऊस व ढगाळ वातावरणामुळ शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक हवामानाचा बदल झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाने तर कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. कर्नाटकात अवकाळी पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झाल्यानं महाराष्ट्रातील कांद्याला तरी चांगला भाव येईल, अशी अपेक्षा होती; परंतु महाराष्ट्रातही अवकाळीची वक्रदृष्टी वळल्यानं इथला कांदाही भिजून सडला. गेल्या आठवड्यात बाराशे किलो कांदा विकून शेतकर्याच्या हाती बारा रुपये पडले! दोन दिवसांपूर्वी कांद्याला किलोमागे एक रुपया भाव मिळाला. चालू हंगामामध्ये कांद्याच्या रोपाला बुरशी होणं, लागवडीनंतर रोप न फुटणं, लागवड केलेला कांदा न उगवणं, हवामानामुळं कांद्याच्या माना लांबणं, पावसामुळं कांदा खराब होणं, निष्कृष्ट दर्जाचं कांदा बियाणं आदी वेगवेगळ्या कारणामुळं शेतकर्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागतं आहे. योग्य दराची प्रतीक्षा करीत गेल्या रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक शेतकर्यांनी केली होती. मात्र, या साठवणुकीतल्या कांद्यावरही अवकाळीची अवकृपा झाली आहे. वाळवून ठेवलेला कांदा हा पावसाने भिजला असून त्याला आता जागेवरच कोंभ फुटू लागले आहेत. त्यामुळे अशा कांद्याला एक रुपया किलो दर मिळाला. सर्वांत मोठे नगदी पिक असलेल्या कांद्याची ही अवस्था पावसामुळं झाली आहे.
निसर्गाचा लहरीपणा, बाजार भावातील अनियमितता यामुळं शेती करावी कशी असा सवाल उपस्थित होत आहे. एका शेतकर्याला ११२३ किलो कांदा विकून या बदल्यात १६६५ रुपये मिळाले होते. हमाली, कडता, वाहतूक खर्च वगळता त्यांच्या हातामध्ये केवळ १३ रुपये शिल्लक राहिले होते. त्यांच्या या कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.