मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचं राजकारणात लाँचिंग होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतून लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. “एक घाव, दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे” यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तेजस यांना ठाकरे कुटुंबियांचे व्हिव्हियन रिचर्ड्स संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ही जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. या शुभेच्छांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिवियन रिचर्ड्स हे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर असून त्यांची फलंदाजी जगभरात चर्चेत होती. जगभरातील गोलंदांचा कर्दनकाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे व्हिवियन रिचर्ड्स हे नाव नसून मोठ्या स्थानाचं विशेषण संबोधलं जातं. म्हणूनच, नार्वेकर यांची जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
माझी जशी तोडफोड सेना आहे, तशी त्याची तोडफोड सेनाच असेल, असं बाळासाहेब ठाकरे तेजसबद्दल म्हणाले होते. भाजपा नेत्याने शिवसेना भवन पाडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेलाही पूर्वीचा आक्रमक बाणा दाखवावा लागणार आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी करायची असेल तर युवासेनेच्या शिलेदारांमध्ये जोश भरण्याची क्षमता तेजसमध्ये असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याची चर्चा शिवसेनेत सुरु असल्याची चर्चा आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे.