Top Newsराजकारण

सोमय्या हल्ला प्रकरणी एकाला अटक; सर्व हिशोब चुकते होणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

पुणे : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला क्वॉटरगेट येथून पकडले. सनी गवते (वय ३९, रा. नाना पेठ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, सोमय्या हल्लाप्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला इशारा दिलाय. पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असं पाटील म्हणाले.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे. शहर प्रमुख संजय मोरे व इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

किरीट सोमय्या हे शनिवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यावेळी धक्काबुक्की झाल्याने सोमय्या पायऱ्यांवर पडल्याने जखमी झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आणि युवा सेना सहसचिव किरण साळी यांनी व्हॉटस्ॲपवर मेसेज पाठविला असून न्यायव्यवस्था व महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उद्या सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहोत.

चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

त्याचबरोबर सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याहीक्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत, असंही पाटील यावेळी म्हणाले.

अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपानंतर माननीय उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आता परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्या ईडीला दिलेल्या जबाबातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची नावे येत आहेत. त्याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी विनंती पाटील यांनी यावेळी केली. तसंच किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे विडंबन वृत्त सामनामधून प्रकाशित करण्याच्या कृतीवर बोलताना पाटील म्हणाले की, “सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादकपद सोडलं आहे का? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, किरीट सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button