Top Newsस्पोर्ट्स

सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताचा श्रीलंकेवर १ डाव, २२२ धावांनी दणदणीत विजय

१७५ धावा अन् ९ बळी, रवींद्र जडेजाची अविस्मरणीय कामगिरी

मोहाली : ‘सर’ रवींद्र जडेजाने भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. नाबाद १७५ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजीतही अविस्मरणीय कामगिरी केली. विराट कोहलीची १००वी कसोटी आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली कसोटी रवींद्र जडेजाने अविस्मरणीय बनवली. भारतीय संघाने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी १ डाव व २२२ धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाबाद १७५ धावा आणि ९ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा या विजयाचा नायक ठरला. दुसऱ्या डावात आर. अश्विनने ४ विकेट्स घेतल्या.

मयांक अग्रवाल (३३), रोहित शर्मा (२९), हनुमा विहारी (५८), विराट कोहली (४५), श्रेयस अय्यर (२७) व रिषभ पंत (९६) यांच्या योगदानानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली. त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९ व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.

श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना श्रीलंकेच्या फलंदाजांना चूका करण्यास भाग पाडले. प्रत्येक गोलंदाजासाठी रोहितने अचूक क्षेत्ररक्षण लावले होते आणि हे पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कौतुक केले. श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार दिमूथ करुणारत्न ( २८), चरिथ असलंका ( २९) व अँजेलो मॅथ्यूज ( २२) हे लंकेकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर गुंडाळून टीम इंडियाने त्यांना फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड कायम राहिली. आर. अश्विनने तिसऱ्या षटकात श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू थिरीमनेला (०) बाद केले. रोहितने स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. पहिल्या डावातील नायक पथून निसंका दुसऱ्या डावात कमाल करू शकला नाही. अश्विनने त्याला ६ धावांवर झेलबाद केले. या विकेटसह अश्विनने भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कपिल देव यांच्यासह संयुक्तपणे (४३४) दुसरे स्थान पटकावले. अनील कुंबळे ६१९ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. मोहम्मद शमीने तिसरा धक्का देताना दिमुथ करुणारत्नेला (२७) बाद केले.

धनंजय डी सिल्वा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी चौथ्या विकेटसाठी १०२ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी करताना भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा एकदा जडेजाने मौके पे चौका मारला. त्याने फिरकीच्या जाळ्यात धनंजयला अडकवले आणि श्रेयस अय्यरकडे सोपा झेल देण्यास भाग पाडले. धनंजय ३० धावांवर बाद झाला. टी ब्रेकनंतर जडेजाने एका षटकात पुन्हा दोन धक्के दिले आणि त्यात अश्विनच्या एका विकेटची भर पडली. अश्विनने या विकेटसह कपिल देव यांचा ४३४ विकेट्सचा विक्रम मोडला.

निरोशान डिकवेलाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. लसिथ इम्बुल्डेनियासोबत त्याने श्रीलंकेचा पराभव टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. पण, जडेजाने पुन्हा कमाल केली आणि त्याने लसिथला बाद केले. मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना विश्व फर्नांडोला ( ०) बाद केले. अश्विनने अखेरची विकेट घेताना श्रीलंकेचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळाला. डिकवेला ५१ धावांवर नाबाद राहिला.

रोहित शर्माचा पराक्रम

विराट कोहलीची १०० वी कसोटी आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिली कसोटी रवींद्र जडेजाने अविस्मरणीय बनवली. १०० वी कसोटी जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. याआधी अनिल कुंबळे, व्ही व्ही एस लक्ष्मण, हरभजन सिंग व इशांत शर्मा यांनी त्यांच्या १००व्या कसोटीत विजय मिळवला होता. रोहित शर्माने भारताचा कर्णधार म्हणून ४२ सामन्यांत ३६ विजय मिळवले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. हा त्याचा सलग १३ वा विजय ठरला. २१ व्या दशकात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाचा सामना जिंकणारा रोहित हा पाचवा कर्णधार ठरला. याआधी रिडीली जेकब्स, ग्रॅमी स्मिथ, केन विलियम्सन, क्विंटन डी कॉक यांनी हा पराक्रम केला आहे. पॉली उम्रीगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाने विजय मिळवणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. पॉली उम्रीगर यांनी १९५५/५६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत एक डाव व २७ धावांनी विजय मिळवला होता.

अश्विनने मोडला कपिल देव यांचा विक्रम

भारतीय गोलंदाज आर अश्विनने श्रीलंकेविरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी अश्विनने कसोटीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत कपिल देव यांना मागे टाकले आहे. कपिल देव यांच्या नावे ४३४ विकेट होत्या, तर अश्विनने ४३५ विकेट घेऊन त्यांना मागे टाकले आहे. आतापर्यंत कपिल देव भारताचे दुसरे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. पण, आता अश्विन दुसरा यशस्वी गोलंदाज बनला आहे. सध्या माजी गोलंदाज अनिल कुंबळे ६१९ विकेटसह भारताचे कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत.

भारताचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी १३१ कसोटीत ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्यांनी २३ वेळा ५ विकेट्स आणि दोन वेळा १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर, आर अश्विनची ही ८५ वी कसोटी आहे. त्याने आतापर्यंत ४३५ विकेट घेतल्या आहेत. यात त्याने ३० वेळा ५ आणि ७ वेळा १० विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या ९ व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ८०० बळींसह अव्वल स्थानावर आहे.

३५ वर्षीय आर अश्विनने वनडेमध्ये १५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याने ८४ कसोटीत ४३० विकेट घेतल्या होत्या. तर, ५ शतके आणि ११ अर्धशतकांच्या मदतीने २८०० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, वनडेच्या ११३ सामन्यात १५१ विकेट्स घेतल्या आहेत. २५ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्‍याने टी-२० आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये ६१ विकेट्स घेतल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button