राजकारण

वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आ. मधुकर ठाकूर यांचे निधन

अलिबाग : वाढदिवशीच काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग-उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन झाले आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून ते आजारी होते. पहाटे पाचच्या सुमारास ७४ वर्षीय मधुकर ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, आज (१५ जुलै) रोजी त्यांचा वाढदिवस होता.

मधुकर ठाकूर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार झाले. मधुकर ठाकुर यांनी २००४ मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. अलिबागमध्ये तब्बल ३२ वर्षांनी शेकापचा पराभव झाला होता.

काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपदही भूषवले. याशिवाय त्यांना प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काँग्रेसने गौरवले होते. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्य़ासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

काँग्रेसचा समर्पक लोकसेवक हरपला : पटोले

अलिबाग उरणचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या निधनाची वृत्त दुःखद आहे. ठाकूर हे काँग्रेसचे विचारांचे सच्चे पाईक होते, आयुष्यभर त्यांनी काँग्रेस विचाराची साथ सोडली नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक समर्पक लोकसेवक हरपला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

ठाकूर यांनी झिरास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले. जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असायचे. अलिबाग व परिसरात काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांनी योगदान दिले. मधुकर ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ठाकूर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button