नवरात्रीच्या निमित्ताने शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीची ‘साखर पेरणी’ !
'मातोश्री'च्या वतीने मिलींद नार्वेकर, किशोरी पेडणेकरांनी घेतले गवळी, नाईकांच्या देवीचे दर्शन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दगडी चाळ आणि त्यापाठोपाठ १४४ टेनामेंटच्या नवरात्रोत्सवांना भेटी दिल्या आणि देवीचे दर्शन घेऊन शिवसेनेच्या पुढील सत्तेसाठी साकड घातले. अरुण गवळी आणि अश्विन नाईक यांना शिवसेनेने आपल्या बाजूला कायम ठेवण्यात यश मिळवल्यास या भागातील शिवसेना आणि भाजप मधील मुकाबला रंगतदार होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ३२ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर फडकणारा भगवा खाली खेचून शहरात भाजपचा महापौर करण्याचा चंग बांधलेल्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने शाह देण्यास सुरुवात केल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. भाजपने शिवसेनेची सर्व स्तरावर कोंडी करायची ठरवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच ही कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे काही नेते आणि मातोश्री यांना आजही गवळी यांनी २००७ साली केलेल्या मदतीची जाण आहे. येणार्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसाठी अत्यंत कडवे आव्हान उभे केले असताना पुढील वर्षी होणार्या निवडणुकीआधी नवरात्रीपासूनच शिवसेना कामाला लागली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी रात्री भायखळ्याच्या दगडी चाळ सार्वजनिक नवरात्र उत्सवाला भेट देऊन दगडी चाळीच्या अंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी आशा अरुण गवळी यांच्या सह नगरसेविका गीता गवळी यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही नेत्यांचे स्वागत जोरदार स्वागत केले. शिवसेनेच्या अडचणीच्या काळात मदत केलेल्या गवळींच्या कन्येला त्यानंतर शिवसेनेने आरोग्य समिती सारख्या महत्त्वाच्या समितीवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.
या भेटीत गवळी कुटुंबियांबरोबर नार्वेकर आणि पेडणेकर यांनी आगामी वाटचालीबाबत काही मिनिटं स्वतंत्रपणे चर्चा केली. गवळी आणि शिवसेना यांच्यातील हा स्नेह असाच राहिला तर येणार्या काळात कठीण झालेला मुंबई महानगरपालिकेचा पेपर काही अंशी शिवसेनेला सोपा जाऊ शकतो. भायखळा परिसरातील शिवसेनेच्या काही नेत्यांना आपल्यापासून लांब ठेवा आणि थेट निकटवर्तीयांमार्फत चर्चा करा, अशी विनंती माजी आमदार अरुण गवळी यांनी काही हितचिंतकांमार्फत शिवसेना पक्ष पक्षप्रमुखांना काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसारच या नव्या मोहिमेची सूत्र नार्वेकर आणि पेडणेकर यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. किशोरी पेडणेकर या देखील याच परिसरात कार्यरत असलेल्या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००७ साली झालेल्या निवडणुकीत राणेंच्या मनगटशाही समोर शिवसेना काहीशी नरम पडेल की काय असे वाटत असतानाच दगडी चाळ आणि १४४ टेनामेंट या गुन्हेगारी जगतातील सत्ता केंद्रांनी शिवसेनेला साथ दिली होती. थेट शिवसेनेच्या महापौरांनाच काँग्रेसमधे घेऊन मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना सपशेल उघडे पाडण्याचा नारायण राणे यांचा प्रयत्न होता. त्यावेळी महत्त्वाच्या पदी असलेले सेनेचे काही नगरसेवक राणे यांच्या बाजूने झुकतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष माजी आमदार अरूण गवळी यांनी आपल्या दोन नगरसेवकांचे समर्थन शिवसेनेला देऊ केले. त्यासाठीच पत्र त्यांनी मिलींद नार्वेकर यांच्या हस्ते उध्दव ठाकरेंकडे पाठवले होते. त्यामध्ये गवळी यांची मुलगी गीता गवळी आणि भावजय वंदना गवळी यांचा समावेश होता. या दोन मतांमुळे त्यावेळी शिवसेनेची मुंबईत होणारी नाचक्की थोडक्यात वाचली आणि सत्ता कायम राहिली होती.
भायखळ्याच्या दगडी चाळीनंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आर्थर रोड जवळच्या १४४ टेनामेंट मधील सार्वजनिक नवरात्र उत्सवातील दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतले. १४४ टेनामेंट ही अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक आणि अमर नाईक यांच्या वास्तव्यासाठी ओळखली जाते. एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या १४४ टेनामेंटवर पोलिसांची सतत करडी नजर असायची. अश्विन नाईक यांची पत्नी नीता नाईक या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या; तर अमर नाईक यांची पत्नी अंजली नाईक यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.