Top Newsआरोग्य

ओमायक्रॉनचं संकट, पुन्हा लॉकडाऊन? मुंबईनंतर दिल्लीत नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी

व दिल्ली : देशात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भर पडत आहे. देशात हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे. देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक बोलावली आहे. सकाळी १० वाजता ही बैठक पार पडणार आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मोदी काय निर्णय घेणार? पुन्हा निर्बंध लादणार का? याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जिनोम सिक्वेंसिंगमार्फत आतापर्यंत देशात ओमायक्रॉनच्या २१४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वाधिक ५७ ओमायक्रॉनबाधित आहेत. तर महाराष्ट्रात ५४, तेलंगणात २४, कर्नाटकात १९, राजस्थानमध्ये १८, केरळात १५ आणि गुजरातमध्ये १४ ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात १५ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.

केंद्राचे राज्यांना पत्र

आरोग्य विभागाकडून सर्व राज्यांचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट तीन पटींनी अधिक वेगानं पसरतो. त्यामुळे आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच केंद्रानं राज्यांना तिसरी लाट रोखण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोविड-१९ आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं पत्र लिहिलं आहे. सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासही सांगितलं आहे.

दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत चालल्यानं केंद्रासह राज्य सरकारंही पावलं उचलताना दिसत आहे. मुंबईनंतर आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काल जारी केला आहे.

दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे. यात आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे. ख्रिसमस सणानिमित्त प्रमाणात सेलिब्रेशन होतं. त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री इंडिया गेटसह दिल्लीतील अनेक ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. या सर्व बाबी लक्षात घेत संसर्गाचा फैलाव रोखण्यासठी दिल्ली सरकारने पावलं उचलली आहेत. डीडीएमएच्या आदेशानुसार दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

नाताळ आणि नववर्षानिमित्त कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन, गर्दी होईल असा कार्यक्रम आयोजित करण्यास पूर्णपणे मनाई राहणार आहे. यावर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तांनी लक्ष ठेवायचे आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय दुकाने व आस्थापनांनांही सूचना देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी ‘नो मास्क, नो एंट्री’ हा नियम बंधनकारक करण्यात यावा, असे डीडीएमएने आदेश दिले आहेत.

मुंबईतही नवीन वर्ष आणि नाताळाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध

मुंबईत गर्दीच्या पार्श्वभूमी प्रशासनाकडून मुंबईत विशेष दक्षता बाळगली जाणार आहे. तुम्ही मोकळ्या जागी पार्टी करणार असाल तर २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. जर तुम्ही घरातच मित्रमंडळींना बोलवून ३१ डिसेंबर सिलिब्रेशन करणार असाल तर घराच्या एकूण क्षमतेपेक्षा ५० टक्के क्षमतेने पाहुण्यांना तुम्हाला बोलायचं आहे. मुंबई महानगर पालिकेकडून सिलिब्रेशनबाबत आखून दिलेल्या आणि पाहुण्यांना पार्टीला बोलावण्यासंदर्भात नियम ठरवले आहेत. गर्दी टाळा, कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळा, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल असं बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button